नागपूर - फक्त 24 तासांत नागपूरच्या पत्रकारिता क्षेत्रातील तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सलग सहा महिने कोरोनाशी लढा देत आपले कर्तव्य बजावणाऱ्या या तिघांनाही कोरोनाची लागण झाली होती. उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. सागर जाधव, सुनील शेट्टी, नितीन पाचघरे अशी या तिनही पत्रकारांची नावे आहेत.
धक्कादायक... 24 तासांत नागपुरातील तीन पत्रकारांचा कोरोनामुळे मृत्यू सागर जाधव हे सकाळ वृत्तपत्रात प्रूफ रीडर म्हणून कार्यरत होते. मात्र, ऐन कोरोनाच्या काळात त्यांची नोकरी गेल्यामुळे ते पार खचले होते. काही दिवसांपूर्वीचे ते एका यूट्यूब चॅनेलमध्ये रुजूदेखील झाले होते. मात्र, त्याच काळात त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यांच्या शरीरातील ऑक्सिजन लेव्हल ७० पर्यंत खाली होती. त्यानंतर त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत असतानाच अचानक त्यांचे निधन झाले. त्यामुळे त्यांचा कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे.
पत्रकाराच्या निधनाची दुसरी बातमी वाडी परिसरातून आली. वाडी, दत्तवाडी हिंगणासह अनेक भागांमध्ये दांडगा जनसंपर्क असलेले सुनील शेट्टी सध्या लोकल न्यूज चॅनलमध्ये पत्रकार म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत होते. ते संपूर्ण कोरोना काळात सक्रिय होते. फिल्डवर काम करताना त्यांना कोरोनाची बाधा झाली. मात्र, उपचारासाठी बेडच उपलब्ध होऊ शकला नसल्याने शेट्टी यांचा मृत्यू झाला.
तिसरी घटना लोकशाही वार्ता परिवारातील सदस्य नितिन पाचघरे यांच्या बाबतीत घडली. नितीन पाचघरे लोकशाही वार्तामध्ये एचआर विभागात कार्यरत होते. आज (शुक्रवारी) पहाटे दरम्यान त्यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते कोरोना संसर्गामुळे १५ दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत होते. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, पुण्यातील पत्रकार पांडुरंग रायकर यांनादेखील कोरोनाची बाधा झाली होती. त्यातच त्यांचाही मृत्यू झाला. त्यांनतर त्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून आणि विविध राजकीय पक्षांकडून मदत मिळायला सुरुवात झाली आहे. त्याचप्रमाणे नागपूरातील या कोरोना योद्धांना मदत मिळावी, अशी मागणी पत्रकारांनी केली आहे.