नागपूर -राज्य शासनाकडून प्राप्त निर्देशानुसार १८ वर्षांवरील वयोगटातील नागरिकांचे लसीकरण बुधवार (२३ जून) पासून नागपूर महानगरपालिकेसह शासकीय असलेल्या १०६ केंद्रांवर सुरू झाले आहे. सकाळी ११ ते संध्याकाळी ५ पर्यंत लसीकरण केल्या जाईल. यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने नोंदणी करता येईल.
लसीकरण केंद्रे -
सध्या नागपूर महानगरपालिका आणि अन्य शासकीय केंद्र मिळून १०६ केंद्रांवर कोव्हिशिल्ड तर तीन केंद्रांवर कोवॅक्सिन लस उपलब्ध आहेत. यातील कोव्हिशिल्ड लस उपलब्ध असलेल्या १०६ केंद्रांवरून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली. ४५ वर्षावरील नागरिकांसाठी कोवॅक्सिन पहिला व दुसरा डोस शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडीकल कॉलेज), बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृह, सिद्धार्थ नगर, आशीनगर झोन च्या मागे (डॉ बाबासाहेब आंबेडकर रूग्णालय) व स्व. प्रभाकर दटके म.न.पा.महाल रोग निदान केंद्र येथे उपलब्ध आहे.
हेही वाचा -अदर पूनावाला भारतात परतले; सरकारने पुरवली वाय दर्जाची सुरक्षा
ज्या १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनी कोवॅक्सिनचा पहिला डोस घेतला आहे त्यांना दुसरा डोस शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडीकल कॉलेज) व स्व.प्रभाकर दटके म.न.पा.महाल रोग निदान केंद्र येथे देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी त्यांना ऑनलाइन नोंदणीचा पर्याय उपलब्ध आहे. केंद्र शासनाच्या नवीन निर्देशानुसार ज्या नागरिकांनी कोव्हिशिल्डचा पहिला डोस १२ आठवड्यांपूर्वी घेतला आहे त्यांना दुसरा डोस दिला जाईल. आरोग्य सेवक, फ्रंट लाईन वर्कर यांनासुद्धा दुसरा डोस दिला जाणार आहे. तसेच ‘ड्राइव्ह इन व्हॅक्सिनेशन’ केंद्रावरसुद्धा १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण सकाळी ९.३० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत होईल.
महापौर तिवारी यांनी केली पाहणी -
नागपुरात आजपासून 18 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला उत्साहात सुरुवात झाली. शहरातील 106 केंद्रावरून 18 वर्षावरील सर्वच नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. महापौर दयाशंकर तिवारी यांनी केंद्राना भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली.