महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पोलिसांनी राबवलेल्या उपक्रमात १८ वाहनचालकांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह - नागपूर पोलीस रॅपिड अँटीजेन चाचणी

गेल्या वर्षभरापासून राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. शासन, प्रशासन आणि आरोग्य विभागाने अथक प्रयत्न करून कोरोना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यात त्यांना यशही आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पुन्हा कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणांवरील ताण पुन्हा वाढला आहे. नागपूरमध्ये एकूण लोकसंख्येच्या तुलनेत सध्या कोरोना रूग्णांची संख्या जास्त असल्याचे समोर आले आहे.

Nagpur police antigen tests
नागपूर पोलीस रॅपिड अँटीजेन चाचणी मोहिम

By

Published : Apr 18, 2021, 9:20 AM IST

नागपूर - रस्त्यांवरील बेजबाबदार नागरिकांची गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने नागपूर शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या आदेशाने शहरात ६० ठिकाणी नाकेबंदी करण्यात आली आहे. यापैकी पाच ठिकाणी वाहनचालकांची रॅपिड अँटीजेन कोविड चाचणी घेण्याची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये २५५ वाहनचालकांची टेस्ट करण्यात आली असून त्यापैकी १८ वाहनचालकांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आज(रविवार)पासून ही मोहीम आणखी व्यापक स्वरूपात राबवली जाणार आहे. त्यामुळे नियम व कायदे तोडणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

१८ वाहनचालकांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे

बेजबाबदार नागरिकांना वठणीवर आणण्यासाठी निर्णय -

'ब्रेक द चेन' अंतर्गत लावण्यात आलेल्या कडक निर्बंधांचे पालन नागरिक करत नसल्याचे निदर्शनास आले आहे. शहरातील अनेक भागात रस्त्यांवर गर्दी वाढल्याचे चित्र आहे. रस्त्यावरील गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने नागपूर पोलिसांनी मोठे पाऊल उचलले आहे. बेजबाबदारपणे फिरताना आढळणाऱ्या लोकांची रस्त्यावरच रॅपिड अँटिजेन चाचणी करण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. महानगरपालिका आरोग्य विभागाच्या मदतीने पोलिसांनी शहरात पाच ठिकाणी असलेल्या नाकेबंदी पॉईंटवर कोविड चाचणी सुरू केली आहे. या चाचणीचा अहवाल लगेच प्राप्त होत असल्याने पॉझिटिव्ह आलेल्या नागरिकांची रवानगी थेट विलगीकरण केंद्रात केली जात आहे. शनिवारी २५५ वाहन चालकांची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यापैकी १८ वाहनचालकांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्या सर्वांना विलगीकरण केंद्रात पाठवण्यात आले आहे.

नागपुरात एका दिवसात सहा हजारपेक्षा जास्त बाधित -

नागपूरात कोरोनाची परिस्थिती चिंताजनक आहे. शनिवारी आलेल्या अहवालात 79 जण दगावले आहेत. तर, 6 हजार 959 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात मृतांची संख्या 135 वर जाऊन पोहोचली आहे.

हेही वाचा -गर्दीवर नियंत्रणासाठी नागपुरातील बाजारपेठेत आता ऑड-इव्हन फॉर्म्युला

ABOUT THE AUTHOR

...view details