नागपूर - एक-दोन नव्हे, तर तब्बल १६ जणांना एकाचवेळी कोरोनाची बाधा झाल्यामुळे नागपुरातील प्रसिद्ध दीक्षाभूमी शेजारी असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय नागपूर महापालिकेने सील केले असल्याची माहिती पुढे आली आहे. पॉझिटिव्ह आलेले सर्व जण हे महाविद्यालयातील कर्मचारी आहेत.
हेही वाचा -नागपूर : सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुंडाचा खून
लक्ष्मीनगर झोनचे सहाय्यक आयुक्त गणेश राठोड यांनी महाविद्यालयासमोर प्रतिबंधित क्षेत्र असल्याचे फलक लावले आहे. महाविद्यालयात एकाचवेळी १६ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची बाब पुढे आली आहे. त्यामुळे, सामूहिक प्रादुर्भाव टाळण्याच्या दृष्टीने आठवडाभरासाठी डॉ. आंबेडकर कॉलेजचा परिसर सील करण्यात आला आहे. महाविद्यालय प्रशासनाला परिसर सॅनिटाईज करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महाविद्यालयातील कोरोनाबाधितांवर विविध ठिकाणी उपचार करण्यात येत आहे. आठवडाभरानंतर महाविद्यालयाचा परिसर उघडायचा का? याचा निर्णय घेण्यात येईल, असे राठोड यांनी स्पष्ट केले.