महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपूरकरांनो सावधान ! पाणी तपासणीत तब्बल 111 ठिकाणचे पाणी आढळले दूषित - स्वच्छता विभाग

पाणी स्वच्छता अभियानाच्या तपासणीत तब्बल वेगवेगळ्या 111 ठिकाणातील पाण्याचे नमुने दूषित आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात असल्याचे उघड झाले आहे.

जिल्हा परिषद नागपूर

By

Published : Apr 24, 2019, 5:39 PM IST

नागपूर- जिल्ह्यातील पाणी स्वच्छता अभियानाच्या तपासणीत तब्बल वेगवेगळ्या 111 ठिकाणातील पाण्याचे नमुने दूषित आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात असल्याचे उघड झाले आहे. दूषित पाण्याचा अहवाल समोर येताच जिल्हा परिषदेच्या पाणी स्वच्छता विभागाने तत्काळ पावले उचलायला सुरुवात केली आहे.

माहिती देताना जिल्हा परिषदेचे अधिकारी

एकीकडे नागपूर शहर आणि जिल्हा दुष्काळाच्या सावटात आहे. अशा परिस्थितीत नागपूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील पिण्याचे पाणी दूषित असल्याचा अहवाल समोर आला आहे. नागपूर जिल्ह्यात हिंगणा, देवालापार, नरखेड, परशिवणी आणि नागपूर या ठिकाणी पाणी तपासणी प्रयोगशाळा आहे. त्यापैकी नागपूरच्या अंतर्गत भिवापूर, उमरेड, कुही, मौदा आणि कामठी या तालुक्यातील प्रयोगशाळेत पाणी तपासले जाते. यासह प्रत्येक तालुक्यातसुद्धा पाणी तपासण्याची प्रयोगशाळा आहे.


गेल्या काही दिवसांपूर्वी नागपूर जिल्ह्यात पाणी स्वच्छता अभियाना अंतर्गत पाण्याचे नमुने तपासण्यात आले. ज्यामध्ये 111 ठिकाणच्या पाण्याचे नमुने दूषित आढळले आहेत. नागपूर जिल्हा ग्रामीण आणि शहरी असा विभागण्यात आला आहे. नागपूर ग्रामीणच्या प्रत्येक भागात वर्षातून 2 वेळा पाण्याच्या स्त्रोतांची अनुजैविक तपासणी केली जाते. जिल्ह्यात 10 हजार 700 पाण्याचे स्त्रोत आहेत. त्याच्यातील 613 पाण्याच्या स्त्रोतांची तपासणी प्रादेशिक प्रयोगशाळेत करण्यात आली. त्यापैकी 111 ठिकाणी दूषित पाणी असल्याचे आढळून आले.

या अहवालामुळे नागपूर जिल्ह्यातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात असल्याचे स्पष्ट झाले आहे. अनुजैविक तपासणीत दूषित पाणी आढळून आल्यानंतर यासंदर्भात उपाययोजना सुचवण्यात आले आहेत. याची माहिती पाणी स्वच्छता विभागाचे जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक विकास पिंगळे यांनी दिली. ज्या स्त्रोतातून पाणी मिळते त्या स्त्रोतात जर दूषित पाणी असेल, तर ही चिंतेची बाब असून नागरिकांना ते पाणी पिल्याने डायरियासारखे आजार होऊ शकतात. त्यामुळे यासंदर्भात जिल्हा परिषदेचे पाणी स्वच्छता विभाग गांभीर्याने उपाययोजना करत असल्याचे विकास इंगळे यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details