नागपूर :बाबांच्या गाडीवरून घरी निघालेल्या ११ वर्षीय चिमुकल्याचा मांजामुळे गळा कापला गेला. त्यामुळे चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. वेद शाहू असे चिमुकल्याचे नाव आहे. तो जरीपटकातील महात्मा गांधी शाळेत पाचव्या इयत्तेत शिकत होता. तर दुसरीकडे पतंग पकडण्याच्या नादात रेल्वेखाली येऊन एकाचा मृत्यू झाला आहे.
मांजा वेदच्या गळ्याभोवती अडकला :वेद कृष्णा साहू (११) हा चिमुकला वडिलांसोबत त्यांच्या ऍक्टिवा गाडीने शाळेतून घरी जात होता. वेद हा गाडीवर समोर बसला होता. घरी जात असताना पतंगीचा मांजा वेदच्या गळ्यात अडकला. पलीकडून तो मांजा ओढल्यामुळे वेदचा गळा कापला गेला. वेदच्या मानेतून प्रचंड रक्तस्राव सुरू झाला. अचानक घडलेल्या घटनेत काय नेमके काय आणि कसे घडले हे देखील कळले नाही. स्थानिकांच्या मदतीने वेदला जरीपटकाच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रक्तस्राव अधिक प्रमाणात होत होता.
शस्त्रक्रियेनंतरही वाचू नाही शकला वेद : वेदच्या मानेतून रक्तप्रवाह मोठ्या प्रमाणात होत होता. रक्तप्रवाह करणारी आणि श्वास घेण्याची नस कापली गेली. त्यामुळे डॉक्टरांनी वेदच्या मानेवर शस्त्रक्रिया करण्याचे ठरवले. मात्र, रक्तस्राव फार अधिक झाल्यामुळे वेदचा मृत्यू झाला. अशा अनेक घटना शनिवारी आणि रविवारी राज्यभरासह देशभरात घडल्या आहेत.
रेल्वेच्या धडकेत चिमुकल्याचा मृत्यू :पंतग पकडताना रेल्वेखाली चिरडून १३ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. घटना धंतोली पोलीस स्टेशन हद्दीतील कुंभार टोली परिसरात घडली. वंश प्रवीण धुर्वे असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. वंश हा भिडे हायस्कूलमध्ये सातव्या वर्गात शिकत होता. वंश हा मुलांसह रेल्वे रुळाजवळ खेळत होता. यावेळी कटलेली पतंग पकडण्यासाठी वंश धावला. मात्र पतंग पकडण्याच्या नादात वंश थेट रेल्वे रुळावर जाऊन पोहोचला. याचवेळी त्याचा पाय रेल्वे रुळात अडकला आणि समोरून आलेल्या रेल्वेखाली तो चिरडला गेला.