नागपूर -विदर्भाकरिता समाधानकारक म्हणजे यावर्षी १०३ टक्के पावसाची नोंद झाली असल्याची माहिती प्रादेशिक हवामान खात्याने दिली आहे. विदर्भातील सर्वच अकरा जिल्ह्यात सरासरी पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद ही उपराजधानीत नागपुरात झाली आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाचा अनुशेष वाढला होता. त्यामुळे जलशयातील पाणीसाठा अर्ध्यावर आला होता. मात्र, सप्टेंबर महिन्यात पावसाने तुफान बॅटिंग केली. यामुळे पावसाचा अनुशेष भरून निघाला असून आता जलाशयेदेखील तुडुंब भरून वाहत आहेत.
नागपूर प्रादेशिक हवामान विभागाचे संचालक याबाबत माहिती देताना यावर्षीचा पावसाळा संपल्याची अधिकृत घोषणा येत्या चार ते पाच दिवसात होण्याची शक्यता आहे. मात्र, प्रादेशिक हवामान खात्याने दिलेल्या आकडेवारीनुसार यावर्षी १०३ टक्के पावसाची नोंद झाली आहे. यावर्षी विदर्भात मान्सून निर्धारित वेळेच्या तब्बल आठ दिवस आधी दाखल झाला होता. मात्र, त्यानंतर पावसामध्ये सातत्य दिसून आले नव्हते. जून, जुलै महिना कोरडा गेल्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या दहा दिवसात पावसाने दमदार पुनरागमन केले होते. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात तर पावसाची तुफान बॅटिंग बघायला मिळाली. त्यामुळे नागपुरकरांना पुढ्याच्या वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे.
पावसाळ्यात विदर्भात १०३ टक्के पाऊस, जिल्हावार माहिती -
विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये ३ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. नागपूरमध्ये +१४ टक्के अधिक पाऊस झाला आहे. तर अकोला जिल्ह्यात ही सरासरीपेक्षा चार टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. अमरावतीमध्ये पावसाचा आकडा ७ टक्क्यांनी कमी झाला आहे. मात्र, नॉर्मल रेनफॉलच्या निकषानुसार (-/+१९ टक्के) अमरावतीमध्ये नॉर्मल पावसाची नोंद झाली आहे. भंडारामध्ये - ८टक्के तर बुलढाण्यामध्ये अधिक ६ टक्के पावसाची नोंद झाली आहे. मात्र, चंद्रपूरमध्ये परिस्थिती समाधान दिसून येत आहे. चंद्रपूरमध्ये ३ टक्के अधिक पाऊस झाला असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. वनसंपदेने नटलेल्या गडचिरोली जिल्ह्यात यावर्षी सर्वात कमी पाऊस झाला आहे. गडचिरोलीत -१३ टक्के पाऊस कमी झाला आहे. तर गोंदिया जिल्ह्यात सुद्धा सरासरीपेक्षा ०७ टक्के पाऊस कमी झाला आहे. वर्धेत + ९, वाशीममध्ये + २३ आणि यवतमाळमध्ये सामान्यापेक्षा + २४ टक्के अधिक पाऊस झाला आहे.
हेही वाचा -ऑनलाइन बुकिंग करून येणाऱ्या भाविकांनाच मिळणार साईदर्शन, शनिदर्शनासाठी ऑफलाइन पद्धत; वाचा नियमावली