नागपूर - शहरात 2018 च्या तुलनेत 2019 मध्ये गुन्हेगारी कमी झाल्याचा दावा येथील पोलीस आयुक्त डॉ. भुषण कुमार उपाध्याय यांनी केला आहे. शहराचा गुन्हेगारी संदर्भातील वार्षिक अहवाल सादर करण्यात आला. यासंदर्भात आयोजित एका परिषदेत बोलताना आयुक्त उपाध्याय यांनी ही माहिती दिली.
डॉ. भुषण कुमार उपाध्याय (पोलीस आयुक्त) नागपूर राज्याची उपराजधानी आहे. मात्र, या उपराजधानीची क्राईम कॅपिटल अशी नकोशी वाटणारीही ओळख आहे. गेल्या काही वर्षात शहरात गुन्हेगारी प्रचंड प्रमाणात फोफावली. गुन्हेगारीचा आलेख सातत्याने वाढतच गेला. मात्र, 2019 या वर्षात शहरातील गुन्हेगारी तब्बल 10 टक्यांनी कमी झाल्याचा दावा, पोलीस आयुक्त भूषण कुमार उपाध्याय यांनी केला आहे.
हेही वाचा -दाट धुके अन् ढगाळ वातावरणाने हरभऱ्याचे नुकसान... शेतकऱ्याने उभ्या पिकावर फिरवला नांगर!
उपाध्याय पुढे म्हणाले, 2018 मध्ये याठिकाणी एकूण 8585 गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी 5367 गुन्हे उघडकीस आले. तर 2019 मध्ये 7722 दाखल झाले. त्यापैकी 5006 उघडकीस आले. यासंदर्भात तुलना केली असता 863 गुन्ह्याची घट झाल्याचे दिसून आले आहे. इतर गुन्हे कमी झाले आहेत. मात्र, 2019 मध्ये खुनाच्या गुन्ह्याची संख्या मात्र 6 टक्यांनी वाढली आहे. गेल्या वर्षात 33 व्यक्तींवर एमपीडिए, 13 जणांवर मोक्का आणि 1500 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. यामुळे पोलिसांनी गुन्हेगारांवर केलेल्या या विविध कारवायांमुळे 2019 मध्ये गुन्ह्यांच्या संख्येत घट झाल्याचे उपाध्याय म्हणाले. तर नव्या वर्षात महिलांची सुरक्षा आणि पोलीस कर्मचाऱ्यांचे आरोग्य या 2 विषयांवर विशेष लक्ष देणार असल्याचेही ते म्हणाले आहेत.