नागपूर - मान्सूनच्या आगमना सोबतच राज्यात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राबवला जाणार आहे. यावर्षी शासनाने 33 कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य निर्धारित केले आहे. त्यापैकी 1 कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य नागपूर विभागाला मिळाले आहे. यासंदर्भात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वनविभाग व इतर शासकीय विभागाच्या अधिकाऱयांची बैठक घेवून निर्धारीत लक्ष्य पूर्ण करण्यासंदर्भात निर्देश दिले.
नागपूर विभागाला 1 कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य; पालकमंत्र्यांनी घेतला आढावा - दिशा निर्देश
33 कोटी वृक्ष लागवडी पैकी 1 कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष नागपूर जिल्ह्याला मिळाले आहे .त्याअनुषंगाने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत वनविभाग आणि सर्वच शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली.
राज्यात हरितक्रांती व्हावी याकरीता गेल्या 4 वर्षांपासून राज्य सरकारमार्फत प्रत्येक पावसाळ्यात वृक्ष लागवडीचे मोठे अभियान राबवले जाते. यावर्षी 33 कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. त्यापैकी 1 कोटी वृक्षारोपणाची जबाबदारी नागपूर विभागाकरिता निर्धारित करण्यात आली आहे. जिल्ह्याला मिळालेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने देखील जय्यत तयारी सुरू केली आहे. याकरिता रविवारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
बैठकीत वनविभाग आणि सर्वच शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी निर्धारीत लक्ष्य पूर्ण करण्यासंदर्भात दिशा निर्देश देण्यात आले. गेल्या 4 वर्षात 60 टक्के झाडांचे संगोपन करण्यात राज्य सरकारला यश मिळाले असल्याचा दावा बावनकुळे यांनी केला. तसेच वृक्ष संगोपनासाठी सुरू असलेले प्रयत्न वाढवणार असल्याचेही त्यांनी म्हटले.