मुंबईZero Death In Mumbai Railway:रेल्वेचा ट्रॅक क्रॉस करणे आणि रेल्वेच्या गर्दीमधून खाली पडण्याच्या घटना प्रचंड घडतात. केवळ सप्टेंबर 2023 मध्ये 288 घटना घडल्या. तर रूळ क्रॉस करून जाण्याच्या 505 घटना घडल्या. यामुळे मृत्यूला आमंत्रण मिळते. त्यामुळेच मध्य रेल्वेने शून्य मृत्यू मोहीम सुरू केलेली आहे. या मोहिमेमध्ये मुंबईतील सर्व खासगी, सरकारी, निम सरकारी अशा कार्यालय संस्थांना वेळा बदलण्याची विनंती मध्य रेल्वेने केलेली आहे. सुमारे साडेचारशे अशा कार्यालयांना विनंती पत्र धाडले आहेत.
'या' आहेत कार्यालयाच्या वेळा:छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे म्हणजेच अप दिशेने सकाळी येताना 8 वाजेपासून 11 वाजेपर्यंत कार्यालयात येण्याच्या वेळा कराव्यात. जर छत्रपती शिवाजी टर्मिनस पासून कल्याण दिशेने म्हणजेच डाऊन दिशेकडे जाताना कार्यालयाच्या वेळा सायंकाळी 5 ते रात्री 8 दरम्यान ठेवाव्यात. यामध्ये सरकारी, खासगी संस्थांनी सकाळी 9:30 ते 11:30 वाजेपर्यंत कार्यालयात येण्याची उभा ठेवावी. तर सायंकाळी ऑफिसमधून घरी निघण्यासाठी 5:45 वाजे पासून 07:45 वाजे पर्यंत ऑफिस मधून बाहेर पडण्याची मुभा ठेवावी. जेणेकरून लोकलची गर्दी कमी होऊन अपघात आणि मृत्यू कमी होईल.
कर्मचाऱ्यांनी बदलत्या वेळेचे केले पालन:यासंदर्भात मध्य रेल्वेचे मुंबई विभागाचे प्रबंधक रजनीश कुमार गोयल म्हणाले की, लोकलमध्ये प्रचंड गर्दीमुळे अपघातात नागरिकांचा जीव जातो. ते टाळण्यासाठी आम्ही 'झिरो डेथ' मिशन मोहीम सुरू केले आहे. यामध्ये सरकारी, खासगी, निमसरकारी संस्था, कार्यालयांनी आपल्या कार्यालयाच्या वेळा लवचिक कराव्यात अशी विनंती केली आहे. याचा सकारात्मक परिणाम मध्य रेल्वेच्याच कार्यालयामध्ये दिसू लागला आहे. मध्य रेल्वेच्या 20% कर्मचाऱ्यांनी या बदललेल्या वेळेचे पालन केलेले आहे. त्यामुळे गर्दी कमी होण्याकडे वाटचाल सुरू झालेली आहे.