मुंबई : भारतात सध्या बीटीएस आर्मीची मोठी क्रेझ आहे. हा एक कोरियन बँड आहे. काही मित्रांनी एकत्र येत त्यांचा म्युझिकल ग्रुप सुरू केला. अल्पावधीतच या मित्रांचा ग्रुप इतका प्रसिद्ध झाला की आता त्यांचे जगभर चाहते आहेत. यात आपला भारत सुद्धा मागे नाही. या ग्रुपमधील कलाकारांचे भारतात इतक्या मोठ्या प्रमाणात चाहते आहेत की, अनेकांनी कोरियन गाणी ऐकायला सुरुवात केली. यामध्ये तरुण वर्गाची मोठा संख्या आहे. अनेक तरुणी या बीटीएस आर्मीच्या फॅन आहेत. या बँडची प्रसिद्धी आणि त्यांच्या फॅन्सची संख्या बघता मुंबईतील एका तरुणाने आता चक्क कोरियन फुल स्टॉलच चालवायला सुरुवात केली आहे.
द कोरियन स्टेशन मालाडला सुरू:या बीटीएस आर्मीची महाविद्यालयीन तरुणींमध्ये मोठ्या प्रमाणात क्रेझ दिसते. अनेक तरुणींना आपण एकदा तरी कोरियात जावे असे वाटायला लागल आहे. हीच बाब लक्षात घेऊन मुंबईच्या एका तरुणाने मलाड येथे कोरियन पदार्थ नूडल्स विकायला सुरुवात केली आहे. मुंबईत आतापर्यंत चायनीजच्या गाड्यांवर नूडल्स मिळतात. इन्स्टंट नूडल्स आहेत. मात्र, यात आता कोरियन पद्धतीने बनवल्या जाणाऱ्या नूडल्सची देखील भर पडली आहे. विशेष म्हणजे या तरुणाने आपल्या दुकानाला नाव देखील 'द कोरियन स्टेशन' असे दिले आहे. त्याने हे नाव मराठी आणि कोरियन भाषेमध्ये लिहिले आहे.
कोरियन न्यूडल्स तरुणाईचे आकर्षण: एखादी चांगली आयडिया आणि व्यवसाय करण्याचे कौशल्य असेल तर तुम्ही एक यशस्वी व्यावसायिक होऊ शकता. याच सूत्राचा वापर करून मुंबईतील शशांक डेहलीकर या तरुणाने कोरियन पद्धतीचे नूडल्स विक्रीचा निर्णय घेतला. एका बाजूला तरुणांमध्ये नूडल्सची वाढती आवड आणि त्यात ही बीटीएस आर्मीची वाढती क्रेझ आहे. या दोन्हीचा योग्य मेळ शशांकने साधला आणि त्याच्या छोट्याशा व्यवसायाला सुरुवात केली. सध्या या कोरिया नूडल्सच्या दुकानाला तरुणांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. द कोरियन स्टेशन हे तरुणाईच्या आवडीचे ठिकाण बनत आहे.