मुंबई Mumbai Suicide News : मुंबई येथील पश्चिम उपनगरातील कांदिवली परिसरातील एका २१ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. प्रकाश झा असं आत्महत्या केलील्या तरूणाचे नाव आहे. शनिवारी रात्री ८:३० वाजताच्या सुमारास त्यांनी राहत्या घरी आत्महत्या केल्याचं शेजाऱ्यांना दिसलं आणि त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. प्रकाश झा गेल्या अनेक महिन्यांपासून बेरोजगार होता. अखेर बेरोजगारीच्या नैराश्येतून त्याने आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण राणे यांनी सांगितलं.
शेजाऱ्याने दरवाजा ठोठावला तेव्हा... :मृत प्रकाश झाची आई देखील मनोरुग्ण असून तिच्यावर उपचार करण्यासाठी वडील बिहारला गेले होते. प्रकाश झाचे वडील हे टॅक्सी चालक आहेत. आई-वडील घरी नसल्याचं पाहून प्रकाशने आत्महत्येचे पाऊल उचललं. शेजाऱ्यांना प्रकाश शेवटचा 24 नोव्हेंबरला रात्री आठ साडेआठच्या सुमारास दिसला होता. त्यानंतर तो घरातून बाहेर आल्याचं शेजाऱ्यांनी पाहिलं नाही. दरम्यान दुसऱ्या दिवशी सायंकाळी सात-साडेसात वाजताच्या सुमारास पाणी भरण्यासाठी शेजाऱ्याने दरवाजा ठोठावला. मात्र दरवाजा ठोठावल्यानंतर आतून काहीही प्रतिसाद न आल्यानं, धक्का देऊन दरवाजा उघडला असता प्रकाशचा मृतदेह दिसला. त्यानंतर ताबडतोब पोलिसांना याबाबत माहिती शेजाऱ्यांनी दिली. घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचून प्रकाशचा मृतदेह ताब्यात घेतला. तसेच पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी भगवती रुग्णालयात (Bhagwati Hospital) पाठवला.