मुंबई - शहरातील साकीनाका रोड परिसरात एका तरुणाला चोर समजून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेत जखमी झालेल्या तरुणाचा रुग्णालयात नेण्याआधीच मृत्यू झाला. सतीश राजभर (वय २४) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी साकीनाका पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून एकजण फरार आहे. तर, न्यायालयाने या तिघांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
चोर समजून तरुणाला बेदम मारहाण; रुग्णालयात नेताना वाटेतच मृत्यू; तिघे अटकेत - मुंबईत तरुणाला बेदम मारहाण
रविवारी रात्रीच्या सुमारास साकीनाका रोड परिसरात एका तरुणाला चोर समजून काहींनी बेदम मारहाण करुन पळ काढला. या घटनेत बेशुद्धावस्थेत असलेल्या तरुणाला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी साकीनाका पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
साकीनाका रोड येथील बत्रा निवासातील एका घरात रविवारी रात्री ११ च्या सुमारास सतीश राजभर हा तरुण शिरला. ही गोष्ट तिथला स्थानिक रहिवासी असद आलम याच्या लक्षात आली. त्याने दानिश शेख, तपनदास मंडलसह आणखी एका मित्रास याबाबत सांगितले. तेव्हा त्या घरात शिरलेली व्यक्ती चोर असल्याच्या संशयावरून चौघांनीही त्यास घेरले. पोलिसांच्या ताब्यात देण्याऐवजी त्यांनी त्याला एका ठिकाणी बांधून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यात तो जबर जखमी झाल्याचे लक्षात येताच चौघेही तिथून सटकले.
काही वेळाने बेशुद्धावस्थेत असलेल्या सतीशकडे तिथल्या सुरक्षारक्षकाचे लक्ष गेले. त्याने साकीनाका पोलिसांना कळविल्यानंतर पोलिसांचे पथक तिथे पोहोचले. बेशुद्धावस्थेतील सतीशला नजीकच्या रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी लगेचच राजभरच्या हत्येस कारणीभूत असलेल्या चौघांचा तपास सुरू केला. मारहाणीनंतर फरार झालेले आलम, शेख, मंडल हे बिहारला जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने शोध घेत तिघांनाही अंधेरी रेल्वे स्थानक भागातून अटक केली. त्यांचा आणखी एक सहकारी फरार असून त्याचा शोध सुरू आहे. पोलिसांनी तिघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.