मुंबई - राजावाडी रुग्णालयात आयसीयूमध्ये गंभीर स्वरूपात दाखल केलेल्या श्रीनिवास यल्लपा या तरुणाचे डोळे उंदराने कुरतडले होते. मंगळवारी हा प्रकार उघडकीस आला होता. बुधवारी (दि.23 जून) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. मात्र हा उंदराने कुरतडल्यामुळे त्याचा मृत्यू झाला नसून त्याचे अवयव निकामी झाल्याने मृत्यू झाल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य समितीच्या अध्यक्षा राजुल पटेल यांनी दिली. या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आल्याची माहितीही महापौर किशोरी पेडणेकरांनी दिली.
राजावाडी रुग्णालयात डोळे कुरतडलेल्या "त्या" तरुणाचा मृत्यू
श्रीनिवास यल्लपाचा मृत्यू उंदराने कुरतडण्यामुळे झालेला नाही. त्याचे अवयव निकामी झाल्याने मृत्यू झाल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य समितीच्या अध्यक्षा राजुल पटेल यांनी दिली. तर, या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आल्याची माहितीही महापौर किशोरी पेडणेकरांनी दिली.
अवयव निकामी झाल्याने मृत्यू -
श्रीनिवास यल्लपा या २४ वर्षीय रुग्णाला दोन दिवसांपूर्वी राजावाडी रुग्णालयात दम लागत असल्याने दाखल केले होते. त्याला मेंदूज्वर झाला होता. तो दारू पित असल्याने त्याचे लिव्हर व इतर अवयव काम करत नव्हते. त्याला दाखल केले त्याचवेळी त्याची प्रकृती गंभीर होती. त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. आयसीयूमध्ये त्याच्या डोळ्याच्या खालच्या पापण्या उंदराने कुरतडल्या होत्या. त्याचे डोळे कुरतडले नव्हते. बुधवारी त्याचा मृत्यू झाला. मात्र त्याचा मृत्यू उंदराने कुरतडण्यामुळे झालेला नाही, असे राजुल पटेल यांनी सांगितले. तसेच या प्रकरणी मृत युवकाच्या नातेवाईकाला नुकसान भरपाई देण्यात यावी अशी सूचना पालिका प्रशासन आणि आरोग्य विभागाला केली असून पालिका रुग्णालयामधील आयसीयू खासगी संस्थांकडून काढून पालिकेच्या ताब्यात घेण्याची स्थायी समितीत मागणी केल्याचेही पटेल यांनी सांगितले.
स्थायी समितीमध्ये पडसाद -
श्रीनिवासचा डोळा उंदराने कुरतडल्याच्या घटनेचे पडसाद बुधवारी पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत उमटले होते. क्रिटिकेअर या खासगी संस्थेला राजावाडी रुग्णालयातील आयसीयू चालवण्यास देण्यात आले आहे. या प्रकरणी या खासगी संस्थेवर कारवाई करून करार रद्द करावा, अशी मागणी स्थायी समितीच्या बैठकीत करण्यात आली.
चौकशीचे अतिरिक्त आयुक्तांनी दिले आदेश -
दोन दिवसांपूर्वी श्रीनिवासला राजावाडी रुग्णालयात दम लागत असल्याने दाखल करण्यात आले होते. मंगळवारी सकाळी त्याच्या नातेवाईकांना त्याच्या डोळ्यातून रक्त येत असल्याचे दिसले. त्यांनी डोळे तपासले असता उंदराने कुरतडल्याचे समोर आले. याबाबत त्यांनी रुग्णालयातील नर्सना सांगितले असता त्यांनी त्यांना उद्धटपणे उत्तरे दिल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. हा प्रकार समोर येताच डोळ्यांच्या डॉक्टरांना बोलावण्यात आले. त्यांनी तपासणी केली असता डोळ्यांना कोणत्याही प्रकारची इजा झालेली नसून त्याच्या पापण्याखाली उंदराने कुरतडल्याचे निदर्शनास आले होते. हा प्रकार गंभीर आहे. आयसीयू तळ मजल्यावर असला तरी सर्व बाजूने बंद आहे. पावसाळा असल्याने दरवाजामधून तो उंदीर आत गेला असावा. तसेच अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी उपाययोजना करण्यात येत असून पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी चौकशीचे आदेश दिले असल्याची माहिती महापौरांनी दिली.