मुंबई -राजस्थान काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडीचे पडसाद राज्यातही उमटण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे तरुण नेते व मुंबईचे माजी प्रदेशाध्यक्ष मिलिंद देवरा, माजी खासदार प्रिया दत्त आणि माजी मुंबई प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम आदी नेते आपल्याच पक्षावर नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यासाठी विविध मार्गांनी त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे येत्या काळात मध्यप्रदेश आणि राजस्थानप्रमाणेच राज्यातील तरुण नेत्यांनीही बंडखोरी केल्यास त्यातून होणारी पडझड काँग्रेसला आवरणे कठीण होणार असल्याचे बोलले जात आहे.
राजस्थानमधील घडामोडींचे पडसाद महाराष्ट्रातही; देवरांची पक्षविरोधी भूमिका? मुंबई प्रदेश काँग्रेसमध्ये माजी अध्यक्ष संजय निरूपम यांनी वेळोवेळी काँग्रेसच्या अंतर्गत बंडाळीच्या विरोधात भूमिका जाहीर केल्याने त्यांना काँग्रेसने मागील काही महिन्यांमध्ये दूर ठेवले आहे. त्यातच मुंबईतील नेत्यांनी निरूपम यांच्याविरोधात पक्षश्रेष्ठींकडे अनेक तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाल्यास निरूपम हे काँग्रेसची पुन्हा एकदा डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. राजस्थानमधील सुरू असलेल्या घडामोडींवर निरूपम यांनी पक्षावरच टीका करत सचिन पायलट यांना काँग्रेसने सोडून जाण्यासाठी रोखले पाहिजे. सर्वच पक्ष सोडत असतील, तर काँग्रेसमध्ये उरणार कोण? असा प्रश्नही निरुपम यांनी उपस्थित केला होता.
मुंबई काँग्रेसमध्ये मागील काही वर्षांपासून सुरू असलेल्या गटबाजीमुळे मुंबईत काँग्रेसची वाताहत झाली आहे. त्यातच आता राजस्थानच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते संजय निरुपम, मिलिंद देवरा आणि प्रिया दत्त यांची पक्षाच्या विरोधातील नाराजी आता समोर आली आहे. त्यातच मागील काही दिवसांमध्ये देवरा यांनी पक्षाच्या विरोधात जाऊन आपली मते मांडणे सुरू केले असतानाही काँग्रेसकडून त्यावर कोणतीहीच प्रतिक्रिया उमटली नाही. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या चीन हल्ल्याच्या संदर्भातील भूमिकेच्या विरोधात जाऊन देवरा यांनी ट्वीट केले होते, तर केंद्र सरकारच्या अनेक धोरणाचे स्वागत करून केजरीवाल सरकारचेही कौतुक केले होते. यामुळे येत्या काळात देवराही राजस्थानमधील सचिन पायलट यांच्या वाटेवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान काँग्रेसमध्ये सक्रिय झालेल्या माजी खासदार प्रिया दत्त यांनीही पक्षाच्या विरोधात भूमिका सुरू केली आहे. मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत वादाचा त्यांना लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर त्यांनी पक्षापासून अंतर ठेवले आहे. मागील अनेक महिन्यात त्यांनी पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमात सहभाग घेतला नाही. त्यामुळे त्या पक्षापासून दुरावल्याचे बोलले जात आहे.