महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पंतप्रधानांच्या हस्ते गौरव झालेली 'ती' राहतेय फुटपाथवर; उमलत्या फुटबॉलपटुची संघर्षगाथा

मेरी तिच्या दोन लहान बहिणी आणि आई वडिलांसह मुंबईतल्या किंग सर्कल फुटपाथवर राहते. हेच तिचे घर आहे. देशाची मान गर्वाने उंचावणाऱ्या मेरीला रहायला पक्के आणि कायमस्वरुपी घर देखील नाही.

फुटबॉलपटू होण्याचे स्वप्न पाहणारी मेरी नायडू परिस्थीतीशी संघर्ष करत आहे.

By

Published : Mar 20, 2019, 11:31 AM IST

मुंबई - प्रतिभा ही कोणा विशिष्ट वर्गाची जहागिरी नाहीत. ही गोष्ट वेळोवेळी समाजात दिसून येते. याचेच प्रत्यंतर मुंबईतील मेरी नायडू या युवा फुटबॉलपटुला भेटल्यानंतर येते. अवघ्या सतरा वर्षे वयात मेरीने आंतरराष्ट्रीय स्तरावर फुटबॉल खेळात भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. तिच्या कुटुंबाची गरिबी तिच्या कर्तृत्वाच्या आड आली नाही. पण, शासन आणि प्रशासन या गुणी खेळाडूबद्दल अनास्था दाखवत आहे. त्यामुळे फुटबॉलचे मैदान सोडून तिला कुटुंबासोबत जगण्याचा संघर्ष करावा लागत आहे.

पंतप्रधानांच्या हस्ते गौरव -
मेरी नायडू ही सतरा वर्षीय मुलगी. धारावीतल्या छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूलमधल्या या विद्यार्थीनीने अल्पावधीतच फुटबॉलमध्ये प्राविण्य मिळवले आहे. तालुका, जिल्हा ते आंतरराष्ट्रीय पातळीवर तिने फुटबॉलमध्ये आपली प्रतिभा दाखवून दिली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे प्रतिनिधीत्व केल्यानंतर भारताच्या पंतप्रधानांच्या हस्ते तिला गौरविण्यात आले. फुटबॉलची प्रतिमा देऊन पंतप्रधान मोदींनी तिचा सन्मान केला. यामुळे मेरीसह तिचे कुटुंबीय हरखून गेले. मेरीला खेळण्याची उर्मी मिळाली.

पंतप्रधानांच्या सत्कारामुळे मेरी काही दिवस मुंबईसह महाराष्ट्रात प्रकाशझोतात आली. विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते यांनी अभिनंदनाचा वर्षाव तिच्यावर केला. तिच्या खेळात मदत करण्याची आश्वासने दिली गेली. पण, हा बहर ओसरला आणि सगळी आश्वासने हवेत विरली. मनात महत्वकांक्षेचा अंकुर तर बहरला. मात्र, परिस्थितीचा विळखा अजूनही सुटत नाही. अशा परिस्थितीत आपली महत्वकांक्षा, स्वप्न कसे पूर्ण करायचे याची भ्रांत मेरीला पडली आहे. तिच्या पालकांना देखील मुलीची प्रतिभा अशीच विझून जाऊ नये याची चिंता आहे.

हालाकीच्या परिस्थितीमुळे शिक्षण सुटले
मेरी तिच्या दोन लहान बहिणी आणि आई वडिलांसह मुंबईतल्या किंग सर्कल फुटपाथवर राहते. हेच तिचे घर आहे. देशाची मान गर्वाने उंचावणाऱ्या मेरीला रहायला पक्के आणि कायमस्वरुपी घर देखील नाही. महापालिकेच्या अतिक्रमणाचा हातोडा कधी पडेल याचा काही नेम नाही. गेल्या दीड वर्षात तिच्या घरावर चारदा अतिक्रमणविरोधी कारवाई झाली आहे. यात त्यांना आर्थिक आणि मानसिक नुकसान सहन करावे लागले. मेरीने आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधीत्व केले आहे, हे कदाचित पालिका कर्मचाऱ्यांच्या गावीही नसेल. मेरीचे वडील महापालिकेच्या सफाई विभागात कंत्राटी कामगार आहेत. त्यांच्या तुटपुंज्या पगारात घर चालवणे अशक्य आहे. त्यामुळे मेरी आणि तिच्या बहिणींचा शिक्षणाचा भार उचलणे ही तर अशक्यप्राय गोष्ट. त्यामुळे शाळेनंतर मेरीला शिक्षण थांबवावे लागले.


मेरीच्या दोन लहान बहिणी देखील खेळाडू आहेत. आपल्या तिन्ही मुलींनी खेळाडू व्हावे, देशाचे प्रतिनिधीत्व करावे अशी तिच्या वडिलांची इच्छा आहे. पण, एका मुलीचेचे भवितव्य अंधारात असताना बाकीच्या मुलींचे काय होईल, ही भीती त्यांना सतावत आहे. मेरीने मिळवलेली पदके, प्रमाणपत्रे यांचा तिच्या कुटुंबीयांना अभिमान आहे. पण, ही सर्व पदके आता धूळ खात पडली आहेत. मेरीच्या उमलत्या प्रतिभेला शासन प्रतिसाद देणार का हे पाहणे आता महत्वाचे आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details