मुंबई -पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षांच्या प्रमुखांना पत्र लिहिले आहे. या पत्राचे आम आदमी पार्टीने (आप) स्वागत केले आहे. 'ममता दीदींच्या पत्राला आम आदमी पक्ष सकारात्मक प्रतिसाद देईल. त्याबरोबर सर्वसामान्य जनतेनेदेखील त्यांच्या (भाजपा) कुटील राजकारणाला विरोध केला पाहिजे', असे आम आदमी पार्टीचे नेते धनंजय शिंदे यांनी म्हटले आहे.
काय म्हटले आहे पत्रात?
विधानसभा निवडणुकीचा हा टप्पा झाल्यानंतर भाजपाविरोधात रणनिती आखण्यासाठी बैठक करण्यासंबंधी ममता बॅनर्जींनी पत्रातून सूचवले आहे. पत्रात सात मुद्द्यांचा उल्लेख केला आहे. भाजपाकडून लोकशाही आणि राज्यघटनेवर होत असलेल्या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी आपण एकत्र आलो पाहिजे. तसेच, देशातील जनतेसमोर आपण नवा पर्याय ठेवला पाहिजे, असे या पत्रात म्हटले आहे.
पुढील दोन महिन्यात अनेक राज्यात निवडणुका आहेत. निवडणूक आयोगाला ही बटीक बनवून देशात स्वतःचे राज्य यावं यासाठी भाजपा तयारी करताना दिसत आहे. यामध्ये स्वतः देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री देखील दिसत आहेत. मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर देखील या निवडणुकांमध्ये केला जात आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देशातील विरोधी पक्षाच्या प्रमुखांना पत्र लिहिले आहे. भाजपा ज्याप्रकारे संविधानाचा गैरवापर करून देशातील नागरिकांना कमकुवत करत आहे. याची सुरुवात 8 नोव्हेंबर 2016साली नोटा बंदीचा निर्णय घेऊन झाली. दिल्लीत भाजपाला धूळ चारून आम आदमी पार्टी सत्तेत आली. तिथे सर्व अधिकार काढून ते अधिकार उपराज्यपालांना देण्यात आलेले आहे. लोकशाही संपवण्याचा भाजपाचा घाट आहे, असे या तीन पानी पत्रात ममता बॅनर्जींनी लिहिलेले आहे.