मुंबई Yes Bank DHFL Scam Case : येस बँक आणि डीएचएफएलमधील बेकायदेशीर कर्ज प्रकरणांमध्ये येस बँकेचे संस्थापक राणा कपूरसह संजय छाब्रिया याला 28 एप्रिल 2022 रोजी सीबीआयकडून अटक करण्यात आली होती. परंतु त्यानंतर जून 2022 मध्ये संजय छाब्रियाची कोठडी ईडीनं घेतली. त्यामुळं संजय छाब्रिया यानं 'औपचारिक अटक झालेलीच नाही, तर कोठडीतून सुटका मिळावी.' या मागणीसह मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश पी. के. चव्हाण यांच्या एकल पीठासमोर याचिका दाखल केली होती. मात्र, याचिका दाखल करण्यास फार विलंब झालाय आणि नियमांनुसार सुटकेचा आदेश देता येत नाही, असं म्हणत उच्च न्यायालयानं ही याचिका फेटाळली आहे.
काय म्हणाले आरोपीचे वकील :आरोपीचे वकील वैभव कृष्णा म्हणाले की, "अगोदर सीबीआयच्या कोठडीमध्ये आरोपी होता. नंतर जून 2022 मध्ये ईडीनं कोठडी घेतली. त्यामुळंच कोठडीतून सुटका व्हावी, यासाठी आरोपीकडून याचिका करण्यात आलीय. विशेष न्यायालयानं कोठडी सुनावताना संवैधानिक उपायांचं पालन न करताच आरोपीची कोठडी मंजूर केली. तसंच औपचारिकरित्या आरोपीला अटक झालीच नाही. शिवाय अटक करण्याचे कारण देखील ठोसपणे समोर येत नाही. त्यामुळेच कोठडीतून त्याची सुटका झाली पाहिजे."