मुंबईYear Ender 2023 Devendra Fadnavis - भाजपाचे राज्यातील चाणक्य मानले जाणारेदेवेंद्र फडणवीस यांनीसन २०१४ ते २०१९ पर्यंत राज्याच्या मुख्यमंत्री पदाची कारकीर्द पूर्ण केली. मात्र, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांच्याबरोबर मतभेद झाले. त्यानंतर जेमतेम अडीच वर्ष विरोधी बाकांवर काढल्यानंतर शिवसेनेतून एकनाथ शिंदे गट फोडण्यापासून राज्यात शिंदे - फडणवीस सरकार स्थापन करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. अशात स्वतः उपमुख्यमंत्री पदी विराजमान झालेल्या देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार गटालाही सोबत घेऊन घेऊन राज्यातील राजकारणात नवीन समीकरणे तयार केली आहेत.
शरद पवार कुटुंबातच सुरुंग-महत्त्वाचं म्हणजे अजित पवार यांच्यावर बोट दाखवत शिंदे गट शिवसेनेतून बाहेर पडला होता. त्याच अजित पवार यांच्याशी जवळीक साधण्यात देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. केंद्रातील ज्येष्ठ नेत्यांचा विश्वास आणि राज्यातील नेत्यांचा पाठिंबा या जोरावर देवेंद्र फडणवीस हे राज्यातील एक नंबरचे नेते गणले जाऊ लागले आहेत. शिंदे - फडणवीस सरकारला एक वर्ष पूर्ण होत नाहीत, तोच अजित पवार यांना सत्तेत सामील करत फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवार कुटुंबातच सुरुंग लावून दिला आहे. निमित्त अजित पवार हे असले तरी खरा दारूगोळा फडणवीस यांचाचं असल्याचं मत राजकीय विश्लेषक व्यक्त करतात.लोकसभा व विधानसभा निवडणुकीला जेमतेम काही महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना राज्यातील बदलेली राजकीय समीकरणे व त्या मागील देवेंद्र फडणवीस यांची भूमिका ही भाजपासाठी पोषक ठरणारी असू शकते.
कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न चिंताजनक-देवेंद्र फडणवीस यांचा गृहमंत्री पदाचा अनुभव हा दांडगा आहे. परंतु मागील दीड वर्ष पाहिले असता राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न फार गंभीर बनला आहे. महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून सायबर क्राईम सुद्धा आटोक्यात आणण्यासाठी गृहमंत्रालयाकडून शर्थीचे प्रयत्न करूनही त्यात यश येताना दिसत नाही आहे. अशातच आरक्षणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रात रान पेटले. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपसलेल्या आंदोलनाच्या हत्त्याऱ्याने राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला. तसेच पोलिसांनी मराठा आंदोलकांवर केलेला लाठीहल्ला, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर लोकप्रतिनिधींच्या घरावर झालेली जाळपोळ, मराठा समाजासोबत ओबीसी समाज तसेच धनगर समाजाने सुद्धा आरक्षणासाठी केलेला उठाव या सर्व कारणांनी राज्यातील परिस्थिती हाताळणे हीसुद्धा फडणवीस यांच्यासाठी तारेवरची कसरतच आहे.
मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन आणि ललित पाटील ड्रग्ज प्रकरणाचे आव्हान-सध्या गाजत असलेले ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरण व काही दिवसांपूर्वी मुंबई बॉम्ब ब्लास्ट मधील आरोपी संजय कुत्ता यांच्या सोबत असलेले राजकारण्यांचे फोटो तसेच सलीम कुत्ता व ठाकरे गटाचे शिवसेना शहर प्रमुख सुधाकर बडगुजर सोबत झालेली डान्स पार्टी हे सर्व विषय सध्या राज्यात चर्चिले जात आहेत. या प्रकरणाच्या तपासाकडं राज्याचे लक्ष लागून आहे. आतापर्यंत कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर विरोधकांनी वारंवार आवाज उठवला. नागपूर येथील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात या प्रश्नावर उत्तर देताना फडणवीस यांनी विरोधकांची तोंडे बंद केली. एकंदरीत काय तर राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न कितीही गंभीर झाला तरी त्यावर अनुभवान विरोधकांना शांत करण्यात देवेंद्र फडणवीस नेहमीच यशस्वी झाले आहेत. परंतु असे असले तरी पुढील महिन्यात २० जानेवारी रोजी मराठा आरक्षणासाठी मुंबईत धडकणारे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन हाताळण्यासाठी फडणवीस यांना फार मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढण्यात जर सरकार यशस्वी झाले नाही, तर "ना भूतो ना भविष्यतो" असे हे आंदोलन असणार आहे.