मुंबई -पालिकेतील काँग्रेसच्या नगरसेविका व राज्यातील मंत्री अस्लम शेख यांच्या बहीण कमरजहा सिद्दीकी यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची नोटीस देण्यात आली आहे. हे षडयंत्र असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केला आहे. यावर विरोधी पक्ष नेते रवी राजा हे संभ्रमित आणि सैरभैर झाले आहेत. त्यामुळेच ते सत्ताधारी शिवसेनेवर बेछूट आरोप करीत आहेत. भाजपचे कमळ चिखलात रुतलय, त्याला काँग्रेस हात देत आहे, असे वाटत असल्याचा प्रत्यारोप करत विरोधी पक्ष नेते काँग्रेस पक्षाला भाजपच्या दावणीला बांधत असल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी म्हटले.
हेही वाचा -खुशखबर! 11 जानेवारीपासून फास्टटॅगमध्ये 5 टक्के कॅशबॅक
काँग्रेसचा आरोप
काँग्रेसच्या नगरसेविका कमरजहा सिद्दीकी यांना सलग तीन महिने पालिका सभांना गैरहजर राहिल्याने, तुमचे नगरसेवक पद रद्द होईल, अशी नोटीस पालिकेच्या चिटणीस विभागाने पाठविली आहे. वास्तविक पाहता १८ नोव्हेंबर रोजी सिद्दीकी यांनी सुट्टीसाठी पत्र पाठवले होते. मात्र, ते पत्र डिसेंबर महिन्याच्या कार्यक्रम पत्रिकेवर न घेता त्यांना ५ जानेवारीला ऑनलाइन सभागृहात उपस्थित न राहिल्यास, तुमचे पद रद्द करू, अशी नोटीस चिटणीस विभागाने पाठवली. चिटणीस या स्थायी समितीच्या अखत्यारीत येत असल्याने त्यांनी आमच्या नगरसेविकेचे पद रद्द करण्याचे षडयंत्र रचले आहे, असा आरोप विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केला. या विरोधात पालिका आयुक्तांना पत्र देऊन चिटणीसांना निलंबित करण्याची मागणी केल्याचे रवी राजा यांनी सांगितले.
काँग्रेस भाजपच्या दावणीला
विरोधी पक्ष नेते रवी राजा यांच्या स्थायी समितीच्या माध्यमातून षडयंत्र रचले जात असल्याच्या आरोपावर प्रत्युत्तर देताना, गेल्या दहा दिवसापासून विरोधी पक्षनेत रवी राजा हे शिवसेनेवर आरोप करीत आहेत. त्यांचे हे वर्तन काँग्रेसला भाजपच्या दावणीला बांधणार असून कमळाच्या चिखलात हात घालणारे आहे. प्रशासनाने स्थायी समितीत आणलेले कोरोना संबंधीचे सर्व प्रस्ताव मंजूर केले आहेत. अशा आपत्कालीन परिस्थितीत कोणताही प्रस्ताव आम्ही अडवला नाही. बहुमताने ते मंजूर झाले आहेत. भाजपने हे प्रस्ताव रेकॉर्ड करण्याची मागणी केली. या मागणीला काँग्रेसने साथ दिली. हा सर्व प्रकार पाहता, काँग्रेस हे भाजपच्या वळचणीला जात असल्याचे दिसून येते. मात्र, विकासाची कामे होत असताना कोणीही त्याच्या आड येऊ नये, असे यशवंत जाधव म्हणाले.