मुंबई: गुजरातमध्ये जात असताना जागोजागी काँग्रेस आमदाराची अडवणूक करत असल्याचा आरोप आमदार यशोमती ठाकूर यांनी केला आहे. जाणून-बुजून आपल्याला अडवले जात असून दारू कशी गुजरातमध्ये जाते असा सवालही त्यांनी अडवणाऱ्या अधिकाऱ्यांना केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
कुठे कुठे अडवले : काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांना सुरतला जात असताना वापी वलसाड आणि नवसारी या ठिकाणी पोलिसांकडून अडवण्यात आले. गुजरात पोलिसांना वारंवार आपण काँग्रेसचे आमदार आहोत आणि सुरतला जात आहोत हे सांगितल्यानंतरही प्रत्येक ठिकाणी आपल्याला चौकशीच्या नावाखाली नाहक 15 मिनिटे ते अर्धा तास थांबवण्यात आले. असा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला आहे.
गुजरातला दारू कशी जाते :गुजरात पोलिसांच्या या कृतीला आपण घाबरत नसून आपण सुरतला जाणारच आहोत, असे त्या म्हणाल्या. काँग्रेसच्या नेत्यांना आणि आमदारांना जाणीवपूर्वक अडवले जात आहे. काँग्रेसच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना मुद्दाम अडवले जात आहे. त्यांची मुस्कटदाबी केली जात आहे. मात्र याला आपण घाबरत नसून दारू कशी गुजरातमध्ये जाते असा सवाल यावेळी यशोमती ठाकूर यांनी पोलिसांना केला. पोलीस मात्र त्यांना सांगताना दिसत होते की, आम्ही केवळ आमचे काम करीत आहोत आम्ही कोणालाही मुद्दाम अडवत नाही.