मुंबई -घाटकोपर मेट्रो स्टेशनजवळ ( Ghatkopar Metro Station ) बेशुद्ध पडलेल्या महिलेला बाजूने जात असलेल्या पालिकेच्या महिला डॉक्टरांनी सीपीआर देवून शुद्धीत आणले त्यामुळे त्या महीलेवर वेळीच उपचार करून जीव वाचवणे शक्य झाले ( woman fell down unconsciously )आहे. आज जागतिक हृदय दिन ( World Heart Day ) असून या निमित्ताने नागरिकांनी आपली काळजी घ्यावी, तपासण्या कराव्या तसेच रोज ३० मिनिट चालावे असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. तसेच सीपीआरबाबत जनजागृती करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त संजीवकुमार यांनी दिले आहेत.
सीपीआर देवून महिलेचे वाचवले प्राण - काही दिवसांपूर्वी घाटकोपर मेट्रो स्टेशनवर एक २३ वर्षीय महिला अचानक चक्कर येऊन बेशुद्ध पडली. शेजारी उभ्या असणा-या सह-प्रवाशांनी त्या महिलेच्या तोंडावर पाणी मारुन व इतर उपाय करुन तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती महिला कोणताही प्रतिसाद देत नव्हती. त्याचवेळी योगायोगाने तेथून जात असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहार आरोग्य केंद्रातील सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. माधुरी गायकवाड यांचे तेथील गर्दीकडे लक्ष गेले. त्यांनी जवळ येऊन बघितले असता, तिथे बेशुद्ध पडलेली महिला आणि तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करीत असलेले सह-प्रवासी त्यांना दिसले. यानंतर डॉ. माधुरी यांनी महिलेची प्राथमिक तपासणी केली असता नाडी लागत नसल्याचे त्यांना आढळून आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी सदर महिलेस तात्काळ सीपीआर देण्यास सुरुवात केली. सीपीआर अंतर्गत रुग्णाच्या छातीवर विशिष्ट पद्धतीने दाब देण्यासह तोंडावाटे रुग्णाच्या तोंडात अधिक दाबाने हवा फुंकली जाते. यानुसार दोनवेळा सीपीआर दिल्यानंतर सदर रुग्ण महिला काही प्रमाणात शुद्धीवर आली. याप्रसंगी त्या ठिकाणी असणा-या डॉ. प्राही नायक आणि डॉ. चंद्रकांता यांनी देखील याकामी मोलाची मदत केली. तोवर सह-प्रवाशांनी बोलविलेली रुग्णवाहिका आली होती. ज्यामधून सदर महिलेस तेथून जवळच असणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले व पुढील वैद्यकीय उपचार सुरु करण्यात आले. वैद्यकीय उपचारानंतर सदर रुग्ण महिलेची तब्ब्येत ठिक आहे. प्रसंगवधान राखून रुग्ण महिलेवर तात्काळ उपचार करणा-या डॉ. माधुरी यांचे त्या महिलेच्या नातेवाईकांनी आभार मानले आहेत. तसेच मेट्रो रेल्वेच्या संबंधितांनी दूरध्वनी करुन डॉ. माधुरी यांचे कौतुक करीत त्यांना धन्यवाद दिले आहेत.
तपासण्या आणि चालणे महत्वाचे -बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉक्टर संजीव कुमार यांनी आणि सार्वजनिक आरोग्य खात्याच्या प्रमुख डॉ. मंगला गोमारे यांनी देखील वेळच्यावेळी तात्काळ सीपीआर देऊन रुग्ण महिलेचे प्राण वाचविणा-या डॉ. माधुरी यांचे कौतुक केले आहे. या अनुषंगाने डॉक्टर मंगला गोमारे यांनी सांगितले आहे की, सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात नियमितपणे रक्तदाब तपासणी करणे, वैद्यकीय सल्ल्यानुसार वेळोवेळी वैद्यकीय तपासण्या करुन योग्य ते औषधोपचार घेणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचबरोबर दररोज किमान ३० मिनिटे चालणे, तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार योग्य तो व्यायाम करणे, या बाबीदेखील आवश्यक आहेत.