मुंबई World Cup Special Train : आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना रविवार 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. विश्वचषक जिंकण्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये आमनेसामने येणार आहेत. हा खास क्षण आपल्या डोळ्यांनी टिपण्यासाठी क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येनं अहमदाबादला पोहोचत आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीही स्टेडियममध्ये उपस्थित राहणार आहेत. अशा परिस्थितीत दूर-दूरचे भारतीय क्रिकेट चाहते अहमदाबादला पोहोचण्याच्या बेतात आहेत. मात्र तिकिटांसाठी गर्दी चांगलीच वाढलीय. यामुळं क्रिकेटप्रेमांच्या अडचणी दूर करण्यासाठी रेल्वे तीन विशेष गाड्या चालवणार आहे. 19 नोव्हेंबर रोजी होणार्या आयसीसी विश्वचषकाच्या अंतिम सामन्याच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेनं तीन विशेष रेल्वे चालवण्याचं जाहीर केलंय.
पहिली रेल्वे : पहिली रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-अहमदाबाद विशेष एक्सप्रेस (01153) ही रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई इथून 18 नोव्हेंबर रोजी रात्री 10.30 वाजता अहमदाबादसाठी सुटेल. ही रेल्वे 19 नोव्हेंबर रोजी सकाळी 6.40 वाजता अहमदाबादला पोहोचेल. परतीसाठीच्या प्रवासात ही रेल्वे सामना संपल्यानंतर 20 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्पेशल एक्स्प्रेस (01154) मुंबईसाठी मध्यरात्री 01.44 वाजता निघून सकाळी 10.35 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचेल. ही गाडी दोन्ही दिशेने दादर, ठाणे, वसई, सुरत, वडोदरा या रेल्वे स्थानकांवर थांबेल. या गाडीला 17 डब्बे असतील.