मुंबई - कामगार लढ्यात जे संघर्षात्मक अनुभव आले ते पुढील पिढीला समजणे आवश्यक आहे, त्यासाठी लिखाण करावे, असा आग्रह गिरणी कामगार नेते दत्ता इस्वलकरांना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला. साने गुरूजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट आणि राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्यावतीने परळ येथील राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या सभागृहात दत्ता इस्वलकर यांचा 70 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित सत्कार समारंभात थोरात बोलत होते.
"कामगार नेते दत्ता इस्वलकरांनी त्यांच्या अनुभवाचे लिखाण करावे" गिरणी कामगार संघर्ष आणि नर्मदा बचाव आंदोलनाच्या लढ्यावर आधारित कलाप्रदर्शनाचे उद्घाटन थोरात यांनी केले. कामगार नेता होणे सोपी गोष्ट नाही, असा गौरव थोरात यांनी केला. गिरणी संपानंतर गावाला गेलेल्या कामगारांना मुंबईत पुन्हा आणले. त्यांना काम मिळवून दिले. त्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम सुरूच आहे, असे थोरात हे इस्वलकरांबाबत म्हणाले.
'गेल्या सरकारने आमची पाच वर्षे फुकट घालवली'
सत्काराला उत्तर देताना इस्वलकर म्हणाले की, "हा सत्कार लढाऊ गिरणी कामगारांना समर्पित करतो. गिरणी कामगारांना लॉटरीत घरे लागत आहेत. पण रस्त्यावर लढणाऱ्या कार्यकर्त्यांना घरे लागत नाहीत. गिरण्या बंद झाल्याने कामगारांची पत गमावली. पण कधीच प्रतिष्ठा गमावली नव्हती. गिरणी कामगार घर मिळवल्याशिवाय राहणार नाहीत. यासाठी सरकारने घरे बांधण्याची गती वाढवावी. गेल्या सरकारने आमची पाच वर्षे फुकट घालवली. जोपर्यंत शेवटच्या माणसाला घर मिळत नाही, तोवर लढा चालूच राहिल."
सुरू गिरण्या बंद होऊ देणार नाही - पाटकर
मुंबईत सध्या सुरू असलेल्या गिरण्या बंद होऊ देणार नाही. जर तसे झालेच तर गिरण्या ताब्यात घेऊ, असा इशारा सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी दिला.
दरम्यान, गिरणी कामगार संघर्ष समिती आणि नर्मदा बचाओ आंदोलनाच्या लढ्यावर आधारित राष्ट्रीय मिल कामगार संघातकलाप्रदर्शन सुरू आहे. 18 मार्चपर्यंत सकाळी 11 ते रात्री 9 या वेळेत सर्वांसाठी खुले असणार आहे.