मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (दि. 11 ऑक्टोबर) मेट्रो 3 (कुलाबा-वांद्रे-सीपझ)चे कारशेड कांजूरमार्ग येथे हलविण्यात आल्याची घोषणा केली. या घोषणेनुसार मेट्रो 3 आणि मेट्रो 6 चे एकत्र व एकच कारशेड कांजूरमार्ग येथे असणार आहे. त्यानुसार मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) कारशेडच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. कांजूरच्या जमिनीवर एमएमआरडीएकडून सध्या माती परीक्षण करण्यात येत आहे. त्यामुळे आता लवकरच मेट्रो 3 आणि मेट्रो 6च्या कारशेडच्या कामाला वेग येणार आहे. तर महत्वाचे म्हणजे मेट्रो 3 कारशेडसाठी आरेतील शेकडो झाडे कापली जाणार होती. पण, हे कारशेड कांजूरला हलविल्यामुळे जंगल ही नष्ट होणार होते. पण, आता मात्र कांजूरमध्ये एका ही झाड कापावे लागणार नाही, असे म्हणत सेव्ह आरेच्या सदस्यांनी यावर आनंद व्यक्त केला आहे.
आरेतील 33 एकर जागेवर शेकडो झाडे कापत मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) कडून कारशेड उभारण्यात येत होते. पण, पर्यावरणप्रेमी-आदिवासी बांधवांनी सेव्ह आरे चळवळीच्या माध्यमातून अखेर आरे वाचवले आहे तर कारशेड आरेतूनबाहेर फेकण्यात यश मिळवले आहे. आता कांजूरमार्गमध्ये कारशेड होणार असून याच कांजूरच्या जागेला याआधीच्या सरकारकडून आणि एमएमआरसीकडून नकार दिला जात होता. जी कारणे देते भाजप सरकार आणि एमएमआरसी ही जागा नाकारत होती ती कारणे कशी खोटी-तकलादू आहेत हे सेव्ह आरेने न्यायालयात आणि मुंबईकरासमोर मांडले. पण, आज अखेर एमएमआरसीला याच जागेचा स्वीकार करावा लागला आहे. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार कांजूरमार्ग येथेच मेट्रो 3 चे कारशेड होणार आहे.
कांजूरमार्ग आणि भांडुपच्या मध्ये मौजे कांजूर येथे ही 62 एकर जमीन आहे. या जमिनीवर एकही झाड नाही किंवा अतिक्रमण नाही. त्यामुळे कारशेडच्या कामात कुठला ही अडथळा येणार नाही. तसेच एकाही झाडाचा बळी द्यावा लागणार नसल्याची माहिती सेव्ह आरेचे सदस्य रोहित जोशी यांनी दिली आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर सेव्ह आरेच्या सदस्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून काही सदस्यांनी आज थेट कांजूर कारशेडच्या जागेवर धाव घेतली. यावेळी याठिकाणी एमएमआरडीकडून माती परीक्षण सुरु होते अशी माहिती रोहित जोशी आणि स्टॅलिन दयानंद यांनी दिली.
जागा सरकारचीच, तर जमिनीसाठी एक पैसा ही लागणार नाही
कांजूरच्या जागेला विरोध करताना एमएमआरसी आणि तत्कालीन सरकारनकडून अनेक दावे केले जात होते. यातील पहिला दावा म्हणजे ही जमीन खासगी मालकीची आहे. त्यामुळे ही जमीन ताब्यात घेण्यासाठी 5 हजार कोटी लागतील. हा दावा खोटा असल्याचे सेव्ह आरे सातत्याने सांगत होते. तेव्हा आज ही ते या भूमिकेवर ठाम असून आता ही जागा सरकारच्या मालकीची असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे 5 हजार कोटी नव्हे तर शून्य पैसे जागेसाठी लागणार असल्याचे जोशी यांनी सांगितले आहे.