मुंबई - गजबजलेल्या दादर रेल्वे स्थानकात कर्तव्यावर असलेल्या जीआरपी पोलीस कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हृदयविकाराचा झटका आलेल्या एका महिला प्रवाशाचे प्राण वाचले. पोलिसांच्या या सतर्कतेचे समाज माध्यमातून कौतुक होत आहे.
जीआरपी महिला पोलिसांनी वाचवले फलाटावरील महिला प्रवाशाचे प्राण - woman life
गजबजलेल्या दादर रेल्वे स्थानकात कर्तव्यावर असलेल्या जीआरपी पोलीस कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हृदयविकाराचा झटका आलेल्या एका महिला प्रवाशाचे प्राण वाचले. पोलिसांच्या या सतर्कतेचे समाज माध्यमातून कौतुक होत आहे.
ही घटना आज (मंगळवार दि. 25) सकाळी 10 च्या सुमारास दादर रेल्वे स्थानकावरील फलाट नंबर 3 वर घडली. सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमधील महिलांच्या राखीव डब्यात निकिता दिघे (वय 25) ही महिला प्रवास करत होती. दादर रेल्वे स्थानकावर ही लोकल आली असता लोकलमधून फलाटावर उतरल्यावर निकिता दिघे यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यामुळे त्या फलाटावर कोसळल्या. हा प्रकार रेल्वे स्थानकावर उपस्थित असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच, त्यांनी तत्काळ क्षणाचाही विलंब न करता महिलेला तत्काळ उचलून धावत-पळत गर्दीतून मार्ग काढीत दादर रेल्वे स्थानकाच्या फ्लॅटफॉर्म नंबर 6 वरील आकस्मिक रुग्णालयात नेऊन उपचार सुरू केले.
हा सर्व प्रकार रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून या मदत कार्यात गुंतलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे कौतुक पोलीस दल आणि प्रवाशांकडून केले जात आहे.