मुंबई- शहरामध्ये खासगी सार्वजनिक वाहतुकीच्या क्षेत्रात पुरुष वाहनचालकांचे वर्चस्व पाहायला मिळते. मात्र, सुशिला माने या महिला अपवाद ठरल्या आहेत. माने यांची कथा ही महिलांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे. जागतिक महिला दिनानिमित्त त्यांच्याशी केलेली खास बातचीत.
तरुण वयात नवरा जग सोडून गेला. पदरी दोन मुले, सासू, सासरे याला सामोरे कसे जायचे. पण न डगमगता सुशिला यांनी कुटुंब प्रमुखाची जागा घेतली. कला शाखेतून त्यांनी पदवी संपादन केली आहे. खासगी कंपनीत चांगली नोकरी होती. पती आजारी असल्यामुळे नोकरी सोडावी लागली. घरचा गाडा स्वतःच्या खांद्यावर घेतला. सुरुवातीला त्यांनी जेवणाचे डब्बे बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. त्यातून उदरनिर्वाह सुरू होता. पण पैसे कमी पडत होते. दुसरा काही जोडधंदा करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता. यामुळे त्यांनी रिक्षा चालवणे सुरू केले.
गेल्या दीड वर्षांपासून त्या रिक्षा चालवत आहेत. अनेक अडचणींचा सामना करत त्यांनी अनेक महिलासमोर आदर्श ठेवला आहे. सकाळी डब्बा आणि जेवण बनवण्याचे काम सुरू होते. त्यानंतर त्या दुपारी 12 वाजता रिक्षा चालवायला घेतात. दिवसाला 5 तास त्या रिक्षा चालवतात. या व्यवसायातून त्यांना महिन्याला 12 ते 15 हजार सुटतात.
मेहनतीला घाबरत नाही -
महिलांच्या आयुष्यात अनेक वाईट क्षण येतील. पण त्यांनी खचून न जाता सामोरे गेले पाहिजे. माझे पती जेव्हा वारले तेव्हा माझी मूले खूप लहान होती. आता माझी मुलगी सातविला तर मुलगा चौथीला आहे. मी सकाळपासून काम करायला सुरुवात करते. दिवसाला ५ तास रिक्षा चालवते. सुरुवातीला काही प्रमाणात त्रास झाला. पण पुरुष रिक्षाचालकांनी मला सहकार्य केले. माझे एक तत्त्व आहे, मी कोणत्याही प्रवाशाला नाही बोलत नाही. भाडे लांबचे असो की जवळच, मी ते नाकारत नाही. भविष्यात मला रिक्षाचालक महिलांसाठी काही तरी करायचे आहे. स्वतःचे हॉटेल सुरू करायचे आहे. मी मेहनतीला घाबरत नाही. काम केले तर शरीर तंदुरुस्त राहते, असल्याचे सांगत माने यांनी स्त्रीदेखील कोणत्याही क्षेत्रात पुरुषाच्या बरोबरीने उत्तमरित्या काम करू शकते, हे दाखवून दिले आहे.