मुंबई - अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळाचा फटका सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडसह मुंबईला देखील बसला आहे. यात अनेकांचे मोठे नुकसान झालेले आहे. झाड कोसळल्याने घरं, दुकानं, गाड्या यांचे देखील नुकसान झाले आहे. 'देव तारी त्याला कोण मारी' या म्हणीचा प्रत्यय आज मुंबईत आला. विक्रोळीत झाड पडून झालेल्या दुर्घटनेतून एक महिला सुदैवाने थोडक्यात बचावली आहे. हा घटनेचे सीसीटीव्ही फूटेज समोर आले आहे.
तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईत कालच्या दिवसात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस झाला. जोरदार वाऱ्यांमुळे अनेक झाडे किंवा झाडांच्या मोठमोठ्या फांद्या तुटून पडल्या. यामध्ये काही जणांना प्राण गमवावे लागले, तर कोणाला गंभीर दुखापत झाली आहे. विक्रोळी पार्क साईट पोलीस ठाण्यासमोर झाड कोसळले. या घटनेचे सीसीटीव्ही फूटेज समोर आल्यामुळे एक महिला अगदी थोडक्यात वाचल्याचे समोर आले आहे.