मुंबई - चेंबूरच्या पंचशीलनगरमधील महिला गेल्या ११४ दिवसांपासून आपल्या हक्काच्या घरासाठी झोपडपट्टी पुर्नविकास प्राधिकरणाविरोधात (एसआरए) साखळी उपोषण करत आहेत. यापैकी उपोषणकर्त्या गीता मकासरे यांचे आंदोलनाकडे सर्व लक्ष असल्याने पतीसाठी त्यांना जास्त वेळ देता आला नाही. त्यामुळे गुरुवारी सकाळी सायन रुग्णालयात त्यांच्या पतीचा मृत्यू झाला. रामू सुखदेव मकासरे (४३) असे त्यांच्या पतीचे नाव आहे.
घरासाठी उपोषण करताना महिलेने गमावला पतीचा जीव; एसआरएचे दुर्लक्ष नडले - उपोषण
चेंबूरच्या पंचशीलनगरमधील महिला गेल्या ११४ दिवसांपासून आपल्या हक्काच्या घरासाठी झोपडपट्टी पुर्नविकास प्राधिकरणाविरोधात (एसआरए) साखळी उपोषण करत आहेत.
पंचशीलनगरमधील ३०० पेक्षा जास्त रहिवासी मागील ५ वर्षांपासून घरांपासून वंचित आहेत. त्याचबरोबर विकासकांनी बांधलेल्या अर्धवट इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरसोयी आहेत. त्यामुळे येथील महिला २८ नोव्हेंबरपासून बेमुदत साखळी उपोषणाला बसल्या. मात्र, या आंदोलनाला ११४ दिवस झाले तरीही या आंदोलनाकडे एसआरएच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे गीता यांच्या पतीचा बळी गेला, असा आरोप आंदोलकांनी केला आहे.
उपोषणकर्त्या गीता यांचे पती काही महिन्यांपासून आजारी होते. आंदोलनाकडे लक्ष असल्यामुळे पतीसाठी गीता यांना पुरेसा वेळ देता आला नाही. घर मिळत नसल्यामुळे त्यांच्या पतीची मानसिक तणावामुळे प्रकृती खालावली आणि गुरुवारी सकाळी सायन रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. या प्रकारामुळे आक्रमक झालेल्या रहिवाशांनी विकासक आणि संबंधित प्राधिकरणावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.