मुंबई - शिवसेना नेते संजय राऊत यांच्या विरोधात एका उच्चशिक्षित महिलेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. संजय राऊत यांनी अनेकदा आपल्याला धमकी दिली असून आपली हेरगिरी केल्याचाही आरोप या महिलेने केला आहे. याबरोबरच आपला विनयभंग करण्यात आल्याचाही या महिलेचा आरोप आहे. ज्येष्ठ वकील आभा सिंग यांच्यातर्फे या महिलेने मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीश संभाजी शिंदे व न्यायाधीश मनीष पितळे यांच्या खंडपीठासमोर याचिका दाखल केली आहे.
याचिकेत काय काय?
या याचिकेत लिहिलंय की, 2013 व 2018 मध्ये तक्रारदार पीडित महिलेवर हल्ला करण्यात आला होता. तसेच तिला ठार मारण्याची धमकी देत काही जणांनी या महिलेची हेरगिरी केली होती. यासंदर्भात मुंबई पोलिसांच्या झोन 8 कडे तक्रार करूनही स्थानिक पोलीस उपायुक्तांकडून (डीसीपी) कुठलीही कारवाई न केल्यामुळे राज्य महिला आयोगाकडे यासंदर्भात तक्रार करण्यात आली. काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेही पत्राद्वारे यासंदर्भात पीडित महिलेने मदत मागितली आहे. मात्र, यासंदर्भात काहीही कारवाई होत नसल्याने नाईलाजाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत असल्याचे या महिलेने म्हटले आहे.
हेही वाचा -कंगनासोबत वादग्रस्त ई-मेल प्रकरण; ऋतिक रोशन मुंबई गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर