मुंबई -लग्न जमत नसल्याने आलेल्या नैराश्यातून गुरुवारी एका 40 वर्षीय महिलेने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना कांदिवली परिसरात घडली आहे. चारकोप पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रॉक एव्हेन्यू इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून या महिलेने उडी घेतली. डिंपल वाडीलाल, असे मृत महिलेचे नाव आहे. महिला इमारतीवरून उडी मारतानाची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
डिंपल इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारताना या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांना अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. इमारतीच्या गच्चीवर डिंपल यांना वाचवण्यासाठी एक व्यक्ती पुढे सरसावल्याचेही या व्हिडिओमध्ये दिसत आहे. मात्र, त्या व्यक्तीने डिंपल यांना पकडण्याआधीच डिंपल इमारतीवरून खाली पडल्या.