मुंबई - मोलकरीण बनून घर लुटणाऱ्या सराईत चोर महिलेला मुंबई पोलिसांच्या मालमत्ता कक्षाने अटक केली आहे. ही महिला मुंबई शहरातील उच्चभ्रू वस्तीत मोलकरीण बनून घरातील लोकांचा विश्वास जिंकायची. त्यानंतर मालकाच्या घरातील महागड्या वस्तू , देशी-परदेशी चलन, दागिण्यांवर हात साफ करून फरार व्हायची. अखेर पोलिसांनी तिला अटक केली.
जुहू पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुलमोहर रोड विलेपार्ले पश्चिम या ठिकाणी ही चोर मोलकरीण घर कामाच्या नावाने दीपिका आशीषकुमार गांगुली या महिलेच्या घरात काम करत होती. घर काम करण्याच्या बहाण्याने तिने घरात असलेले 10 हजार रुपये, 2500 अमेरिकन डॉलर यासह इतर मौल्यवान वस्तू चोरून जागेवरून पोबारा केला होता. ती नावही बनावट सांगत होती. अशी तक्रार दीपिका आशीषकुमार गांगुली यांनी पोलिसांकडे केली.
सीसीटीव्हीतून महिला सराईत चोर असल्याचे झाले उघड
दीपिका गांगुलींच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या संदर्भात तपास सुरू केला. ही चोर महिला तिचे संपूर्ण नाव पत्ता व कोणतेही कागदपत्र घर मालकांना देत नसल्याचे समोर आले. मात्र पोलिसांनी इमारतीच्या आवारात लावण्यात आलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यातून ही महिला पोलीस रेकॉर्डवरील सराईत चोर असल्याचे समोर आले आहे.