मुंबई- सध्या कोरोनामुळे वस्तू अथवा व्यक्तीला स्पर्श करणे हे जोखमीचे आहे. त्यामुळे संसर्ग होण्याची भीती असते. मात्र, स्मार्टफोनच्या सहाय्याने एटीएम मशीनला स्पर्श न करताही पैसे काढता येणार आहे. कारण, कॅश आणि डिजिटल पेमेंट सोल्युशन आणि ऑटोमेशन टेक्नॉलॉजी पुरवणारी 'एजीएस ट्रॅन्झॅक्ट टेक्नॉलॉजी' या कंपनीने हे नवे तंत्रज्ञान तयार केले आहे. या तंत्रज्ञानाचा उपयोग लवकरच भारतात केला जाणार आहे.
ग्राहकांना एटीएम मशीनच्या स्क्रीनवर दिसणारा क्यूआर कोड स्कॅन करावा लागेल. त्यानंतर संबंधित बँकेच्या मोबाइल एप्लिकेशनमध्ये येणाऱ्या सूचनांचे पालन करावे लागेल. यामध्ये तुम्हाला काढायची असेल ती अमाऊंट, एम-पिन यांसारख्या गोष्टींचा समावेश आहे. क्यूआर कोडद्वारे पैसे काढणे हे अधिक सुरक्षित असल्याचा दावा कंपनीने केला आहे.