मुंबईNawab Malik joined Ajit Pawar Group :महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आज नागपुरात सुरू झालं. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या भूमिकेकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं. नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्या गटाला पाठिंबा देतात, याची उत्सुकता सर्वच राजकीय पक्षांना लागली होती.
सस्पेन्स कायम होता :दाऊदचे सहकारी सलीम पटेल तसंच हसीना पारकर यांच्यासोबत गोवावाला कपाऊंड जमीन व्यवहार केल्याच्या आरोपावरून नवाब मलिक यांना तुरुंगात टाकण्यात आलं होतं. नवाब मलिक एक वर्षाहून अधिक काळ तुरुंगात होते. नंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. हिवाळी अधिवेशनासाठी नवाब मलिक नागपुरात आहेत. आज ते कोणाच्या गटात जाणार? याकडं सर्वांच लक्ष लागलं होतं. मात्र मलिक आज अजित पवार गटाच्या कार्यालयात जाऊन बसले. त्यामुळं नवाब मलिक आमच्या पाठीशी असल्याचा विश्वास आमदार अनिल पाटील, धर्मरावबाबा आत्राम यांनी व्यक्त केला आहे.
मलिक सत्ताधारी बाकावर विराजमान :राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात बंड करून अजित पवार युती सरकारमध्ये सामील झाले. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी आज सकाळपर्यंत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांपैकी एकाही गटाला पाठिंबा जाहीर केलेला नव्हता. मात्र, आज हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नवाब मलिक सत्ताधारी पक्षाच्या बाकावर बसल्यानं चर्चेला पूर्णविराम मिळाल्याचं बोललं जात आहे. यामुळं विधानसभेतील विरोधी पक्षाच्या आमदारांच्या भुवया उंचावल्या आहेत.