महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उद्योगांसाठी लागणारी परवानगी प्रक्रिया सुलभ करणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - ग्रीन इंडस्ट्री

आज खासगी गुंतवणूक संस्थांच्या (प्रायवेट इक्विटी फर्म्स) प्रतिनिधींसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुख्य सचिव अजोय मेहता, औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी संचालक डॉ. पी. अनबलगन उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

By

Published : Jun 24, 2020, 2:06 PM IST

मुंबई -कोरोना संकटानंतर आता राज्यात उद्योगांचे अर्थचक्र सुरू झाले आहे. राज्यात गुंतवणूकदारांसाठी उद्योगस्नेही धोरणाचा अवलंब केला जात आहे. अनेक अनावश्यक परवानग्या कमी करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आज खासगी गुंतवणूक संस्थांच्या प्रतिनिधींसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली. गुंतवणुकीबरोबरच रोजगारनिर्मिती वाढावी, यासाठी आणखी काही परवानग्यांची संख्या कमी करून ही प्रक्रिया अधिक सोपी करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच खासगी गुंतवणूक संस्थांच्या प्रतिनिधींची एक समिती तयार करून राज्यातील उद्योगवाढीसाठी आवश्यक अशा सूचना या समितीच्या माध्यमातून मागविण्यात येतील, अशी माहिती ठाकरे यांनी दिली.

आज खासगी गुंतवणूक संस्थांच्या (प्रायवेट इक्विटी फर्म्स) प्रतिनिधींसोबत मुख्यमंत्र्यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुख्य सचिव अजोय मेहता, औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी संचालक डॉ. पी. अनबलगन उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, कोरोनाने आपल्याला ‘घरी राहा- सुरक्षित राहा’ हे शिकवले आहे. याच धर्तीवर राज्यातील गुंतवणूक सल्लागारांनी सर्व गुंतवणूकदारांना राज्यातच गुंतवणूक करण्याचा सल्ला द्यावा. राज्यातील त्यांची गुंतवणूक ही सुरक्षित राहील, हा विश्वास त्यांनी निश्चित ठेवावा, असे ठाकरे म्हणाले.

राज्यात ग्रीन इंडस्ट्रीला चालना देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ज्या उद्योगांना खूप परवानग्यांची गरज नाही आणि जे लगेच सुरू करता येतील, अशा उद्योगांना ग्रीन उद्योग झोनमधून तत्काळ कार्यरत करता येईल. यासाठी सिंगल विंडो सिस्टीम त्यांना मदतीची ठरू शकेल, असेही ठाकरे म्हणाले.

राज्याने उद्योगस्नेही धोरणाचा अवलंब केलेला आहे. परवानग्यांची संख्या 76 वरुन 25 वर आणली आहे. भविष्यातही राज्यातील गुंतवणूकवाढीसाठी आलेल्या तज्ज्ञांच्या सर्व सूचनांचे स्वागत केले जाईल, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी सांगितले.

मुंबईनजीकच मॉडेल फार्मा पार्क तयार करण्यात येत आहे. त्याचबरोबर नव्या तंत्रज्ञानावर आधारित इलेक्ट्रॉनिक पार्कही उभे राहात आहे. उद्योगवाढीच्या योजनांसाठीची ही केवळ सुरुवात आहे. आपल्याला सर्वांच्या साथीने लांबचा पल्ला गाठायचा आहे. यासाठी आपल्या सगळ्यांचा विश्वास शासनाच्या पाठीशी राहील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

या चर्चेत केदारा कॅपिटलचे मनिष केजरीवाल, के.के. आर इंडियाचे संजय नायर, ब्लॅक स्टोनचे अमित दीक्षित, बेन कॅपिटलचे अमित चंद्रा, वॉरबर्ज पिंकअसचे विशाल महादेविया यांनी सहभाग घेतला. कोरोनानंतर अर्थचक्राला गती देत असताना डिजिटल तसेच तंत्रज्ञान क्षेत्राबरोबरच राज्यात मॅन्युफॅक्चरिंग, औषधनिर्मिती, पायाभूत सुविधा, गृहनिर्माण, ऊर्जा, बॅंकिंग यासारख्या अनेक क्षेत्रात गुंतवणुकीच्या संधी निर्माण होणार असल्याचे मत गुंतवणूक सल्लागारांनी व्यक्त केले.

ABOUT THE AUTHOR

...view details