मुंबई - राज्यात पदोन्नती आरक्षण, ओबीसींचे राजकीय आरक्षण आणि मराठा आरक्षण, अशी आंदोलने केली जात आहेत. आता मुस्लीम समाजाने आमच्या ५ टक्के शैक्षणिक आरक्षणाचे काय झाले, असा सवाल उपस्थित केला आहे. या प्रश्नावर वंचित बहुजन आघाडी आणि रझा अकादमीच्या वतीने आज (सोमवारी) मुंबईच्या आझाद मैदानात मोर्चा काढण्यात येणार होता. या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी मोर्चा होणारच, असा निर्धार वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आला आहे.
मुस्लिम आरक्षण -
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, मुस्लीम समाजाला काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पूर्वीच्या सरकारने ५ टक्के शिक्षण व नोकऱ्यात आरक्षण दिले होते. मुंबई उच्च न्यायालयाने त्यातील शैक्षणिक आरक्षण वैधसुद्धा ठरवले होते. तरीसुद्धा भाजपच्या फडणवीस सरकारने या आरक्षणाचा कायदा मंजूर न केल्याने अध्यादेश रद्द झाला. परिणामी मुस्लीम आरक्षणाची अंमलबजवणी होऊ शकली नाही. मात्र, सध्या महाविकास आघाडीचे सरकार स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणवते. तरीसुद्धा त्यांना मुस्लीम आरक्षणाची अंमलबजावणी करावी, असे का वाटत नाही, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
हेही वाचा -नाशकात मुस्लिम आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मुस्लिम संघटनेचे 'रास्ता रोको'