मुंबई- शिवसेना-भाजप युतीमध्ये राज्यात सत्तेसाठी रस्सीखेच सुरू आहे. या राजकीय नाटकामध्ये राष्ट्रवादी पक्षाची भूमिका महत्त्वाची असणार आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भाजप अथवा शिवसेनेला सतेसाठी कोणत्याही प्रकारचा पाठिंबा देणार नसल्याचे पक्षाचे प्रवक्ते आमदार नवाब मलिक यांनी म्हटले आहे.
नुकतेच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनतेने भाजप-शिवसेना युतीला बहुमत दिले. मात्र, असे असले तरी सत्ता स्थापन करण्यासाठी दोन्ही पक्षात मुख्यमंत्री पदाकरिता रस्सीखेच सुरू आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी वेळ लागत असून भाजपने मागील पाच वर्षांच्या काळात शिवसेनेला जशी वागणूक दिली त्याचा पश्चाताप आता भाजपला होत असल्याचे नवाब मलिक म्हणाले.
त्याचबरोबर, शिवसेनेचे संख्याबळ भक्कम असल्याने शिवसेना ही भाजप पुढे नमते घेणार नाही. आणि शिवसेना केवळ सत्तेमध्ये अर्धा वाटा मागत असून राज्यपाल लवकरच भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी निमंत्रण देतील. त्यामुळे अशा परिस्थितीत शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.