मुंबई -केंद्राने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात आज दिल्लीत ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आंदोलकांनी बॅरिकेडस् तोडल्याने पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला. त्यानंतर शेतकरीही आक्रमक झाल्याने आंदोलनाला हिंसक वळण लागले. अनेक ठिकाणी आंदोलक शेतकरी आणि पोलिसांमध्ये मोठा संघर्ष बघायला मिळाला. यावरून खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका करत सरकार याच दिवसाची वाट पाहत होती का, असा सवाल केंद्र सरकारला केला आहे.
कुठले अदृश्य हात राजकारण करत आहेत-
सरकार याच दिवसाची वाट पाहत होती का, सरकारने शेवटपर्यंत लाखो शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकले नाही. ही कुठल्या प्रकारची लोकशाही आमच्या देशात वाढत आहे. ही लोकशाही म्हणता येत नाही. जर सरकारला वाटले असते, तर हिंसा थांबवता आली असती. दिल्लीमध्ये जे सुरू आहे, त्याचे समर्थन करता येणार नाही. कुणीही असो लाल किल्ला आणि तिरंग्याचा अपमान सहन करणार नाही. मात्र, वातावरण का बिघडले. सरकार शेतकरी विरोधी कायदे का रद्द करत नाही, कुठले अदृश्य हात राजकारण करत आहेत, असे असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारले आहे.
याकरीता कोणाचा राजीनामा मागणार -
संजय राऊत यांनी ट्विटरवर अर्ध्या तासामध्ये दोन ट्विट करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. दुसऱ्या ट्विटमध्ये राऊत असे म्हणतात की, दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. सरकारचे हे अपयश आहे. या अराजकासाठी दिल्लीत ठरवून पायघड्या घातल्या गेल्या. याकरिता कोणाचा राजीनामा मागणार, सोनिया गांधी, ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे, शरद पवार की जो बायडेनचा, इस बात पर त्यागपत्र, राजीनामा तो बनता है साहेब, असे ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे.