मुंबई- राज्यात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची वाढती संख्या पाहता चाचण्या करण्यासाठी मुंबईत आणि पुण्यामध्ये लॅबची आणि लागणाऱ्या यंत्रांची संख्या येत्या बुधवारपर्यंत वाढवण्यात येईल. तसेच, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मनोरंजनासाठी आणि जेवणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
कोरोना विषाणूचे रुग्ण शहरासह राज्यात वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मुंबई महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात दोन तास आढावा घेतला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना मुंबईत ९ आणि राज्यात ३२ कोरोनाचे रुग्ण असल्याची माहिती त्यांनी दिली. कस्तुरबा रुग्णालयात ८० संशयित रुग्ण भरती असून सर्वांची प्रकृती चांगली असल्याचेही त्यांनी सांगितले. दुबईला जो ग्रुप गेला होता त्यांच्यामुळे कोरोनाची मोठ्या प्रमाणात लागण झाली आहे. मुंबईत असलेल्या ९ रुग्णांमध्ये २ कुटुंबामधील ५ रुग्ण असल्याचे देखील टोपे यांनी सांगितले.
कस्तुरबा रुग्णालयातील प्रयोगशाळा ही राज्य पातळीवरची प्रयोगशाळा आहे. येथे कोरोना विषाणूबाबत पॉझेटिव्ह, निगेटिव्ह अहवाल मिळतो. त्यामुळे, प्रयोगशाळेत सर्व उपकरणे, साधने उपलब्ध आहेत का याचीसुद्धा आपण पाहाणी केली. त्याचबरोबर, रुग्णालय प्रशासनाशी सद्या परिस्थिती बाबत चर्चा केली असल्याचे देखील आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.