मुंबई : मुंबई ट्रांस हर्बर लिंक प्रकल्पाच्या पॅकेज २ मधील पहिला सर्वात जास्त लांबीचा म्हणजेच सुमारे १८० मीटर लांबीचा आणि सुमारे २३०० मेट्रिक टन वजनाचा ऑर्थोट्रॉपिक स्टिल डेक उभारला गेला आहे. संपूर्ण प्रकल्पांतर्गत समुद्रात उभारण्यात येणाऱ्या एकूण ७० ऑर्थोोट्रॉपिक स्टिल डेक स्पॅन पैकी एकूण ३६ स्पॅनची उभारणी पूर्ण झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये हा स्पॅन उभारला गेला आहे. या प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, सिंगापूर मध्ये जी ओपन रोड टोलिंग सिस्टीम प्रणाली आहे, ती येथे आपण सुरू करणार आहोत.
९० टक्के पूर्ण : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत मुंबई ट्रांस हर्बर लिंक (MTHL) या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे काम सध्या प्रगतीपथावर असून प्रकल्पाची स्थापत्य कामे सुमारे ९० टक्के पूर्ण झाले आहे. मुंबई ट्रांस हर्बर लिंक (MTHL) हा मुंबई शहरातील शिवडी व मुख्य भूमीवरील न्हावा यांना जोडणारा सुमारे २२ किमी लांबीच्या ६ पदरी पूल आहे. यात 6 मार्गिका आहेत. या पुलाची समुद्रातील लांबी सुमारे १६.५ किमी असून जमिनीवरील पुलाची एकूण लांबी सुमारे ५.५ किमी इतकी आहे.
नेव्हिगेशनल स्पॅनची उभारणी :मुख्य पुलाची रचना ही ६० मीटर लांबीच्या स्पॅनची असून मुख्यतः ते सेगमेंटल बॉक्स गर्डर व कॉक्रिट डेक आहेत. मुंबई पोरबंदर प्रकल्पाचे एक प्रमुख वैशिष्ट्य असलेला हा सागरी क्षेत्रातील नॅव्हिगेशन भागातील स्टील डेक आहे. ज्याला तांत्रिकदृष्ट्या ऑर्थोोट्रॉपिक स्टील डेक (OSD) असे म्हणतात. समुद्रातील जहाजांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी मोठ्या लांबीचे हे स्पॅन समुद्राच्या पाण्याच्या पातळीपासून सुमारे २५ मीटर उंच बांधण्यात येत आहेत. त्यामुळे हा स्पॅन नेव्हिगेशनल स्पॅन म्हणून ओळखला जातो.
ओपन रोड टोलिंग सिस्टिम असणार : मुंबई ट्रांस हर्बर लिंक हा देशातला पहिला सर्वात लांबीचा सागरी सेतू आहे, ज्यामध्ये ओपन रोड टोलिंग (ORT) सिस्टिम असणार आहे. सध्या ही सिस्टिम सिंगापूर मध्ये लागू आहे. ती सिस्टिम भारतात लागू करण्याचा प्रयत्न चालू आहे. ORT चा मोठा फायदा असा आहे की प्रवासी वाहने टोल भरण्यासाठी वेग कमी न करता टोल प्लाझातून महामार्गाच्या वेगाने वाहन चालवू शकतात" अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
मुंबई ट्रांस हर्बर लिंक पॅकेज २ मधील एकूण ३२ ओएसडी स्पॅनपैकी १५ ओएसडी स्पॅन आधीच स्थापित केले गेले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत १८० मीटरचा हा पॅकेज २ मधील सर्वात लांब ओएसडी स्पॅन स्थापित करून एमएमआरडीएने, मुंबईची बेटांचे शहर अशी ओळख पुसण्याचा दृष्टीने आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे, अशी माहिती एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एस. व्ही.आर. श्रीनिवास यांनी दिली.