नवी मुंबई -नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या विरुद्ध त्यांची पत्नी संजीवनी काळे यांनी नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. शारीरिक व मानसिक छळ, जातीवाचक बोलणे या कलमांखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या १३ वर्षांपासून गजानन काळे हे त्यांच्या पत्नीला मारहाण करत असल्याचा तसेच त्यांचे अनेक महिलांशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप गजानन यांच्या पत्नीने तक्रारीत म्हटले आहे.
नवी मुंबई मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांच्याविरुद्ध पत्नीने दाखल केला गुन्हा रंग व जात यावरुन काळे पत्नीला देत टोमणे -
२००८ ला गजानन काळे व संजीवनी काळे यांचा आंतरजातीय प्रेमविवाह झाला होता. लग्नानंतर काही दिवसांत गजानन काळे यांनी पत्नीचा शारीरिक व मानिसक छळ करण्यास सुरुवात केली असे त्यांच्या पत्नीचे म्हणणे आहे. ते सतत त्यांच्या पत्नीला तू काळी आहेस, बौद्ध आहेस म्हणून मला तुझ्यासोबत बाहेर जायला लाज वाटते, असे म्हणून त्यांना सावळ्या रंगावरून टोमणे देत होते. तसेच, संजीवनी यांना जातीवाचक शिव्याही देत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तुझ्या वडिलांची पोस्ट बघून मी तुझ्याशी लग्न केले आहे. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नसल्याचे काळे हे त्यांच्या पत्नीला म्हणत असतं, असे संजीवनी यांनी सांगितले.
नवी मुंबई मनसे शहराध्यक्ष गजानन काळे मुलाच्या सात पिढ्या बसून खातील इतका पैसा मी कमावला आहे -
काळे हे पत्नीला घर खर्चासाठी पैसे देखील देत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मुलगा निर्मिक काळे याच्या सातपिढ्या बसून खातील एवढा मी पैसा कमावला आहे. तू माझं काहीच वाकडे करू शकत नाही. दोन दिवस चर्चा होईल नंतर सगळे थंड होईल असेही काळे यांनी पत्नीला म्हटले आहे, असे त्या सांगतात. माझ्या पतीकडे कितीही पैसा असो मी आता माझ्या मुलांसाठी आणि माझ्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात लढणार आहे. यासाठी मला कितीही त्रास होईल, धमक्या येतील. मात्र, मी गप्प बसणार नाही असे वक्तव्य काळे यांच्या पत्नीने केले आहे.
काळे यांचे अनेक महिलांशी अनैतिक संबंध -
गजानन काळे यांचे अनेक महिलांशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे. तसेच, यामुळे काळे हे तिला मारहाण करत असेही तिने तक्रारीमध्ये म्हटले आहे. गजानन यांचे अनेक परस्त्रीयांसोबत अनैतिक संबंध असल्याचे अनेक वेळा माझ्या निदर्शनास आले. हे काळे यांना येत असलेले फोन कॉल, मेसेजवरुन लक्षात येत होते, मी वारंवार समजून सांगायचे. पण माझ्या काही मैत्रिणी आहेत. तू याच्यात लक्ष घालू नको, असे म्हणून काळे हे पत्नीला मारहाण करायचे असेही गजानन काळे यांच्या पत्नीने पोलीस तक्रारीत म्हटले आहे. तसेच दोन नामांकित टीव्ही चॅनल्सच्या अँकरशी काळे यांचे संबंध असल्याचेही काळे यांच्या पत्नीने तक्रारीत म्हटले आहे. नेरुळ पोलीस ठाण्यात गजानन काळे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा -ग्राहक बनून आलेल्या चोरट्यांनी पिस्तुलचा धाक दाखवून लुटला बार