मुंबई: सांताक्रूझ परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विवाहबाह्य संबंधामध्ये अडसर ठरत असल्याने महिलेने प्रियकराच्या मदतीने व्यावसायिक पतीला जेवणातून काही घातक रसायने मिसळून खायला दिली दिली . या प्रकरणी पोलिसांनी चार महिन्यांनंतर या प्रकरणाचा उलगडा करत कविता शहा आणि तिचा प्रियकर हितेश जैन याला अटक केली आहे. पतीचा मृत्यू नैसर्गिक असल्याचा भास निर्माण करण्यात आला. परंतु वैद्यकीय अहवाल आणि पोलिसांच्या तपासामुळे हा मृत्यू नैसर्गिक नसुन तो खुन आहे हा प्रकार समोर आला आणि त्यांचे पितळ उघडे पडले.
सांताक्रूझ एका सोसायटीमध्ये कमलकांत शहा हे कपडा व्यावसायिक पत्नी आणि दोन मुलांसह वास्तव्यास होते. कपडा निर्मितीचा मोठा व्यवसाय असून काळबादेवी आणि भिवंडी येथे त्यांची कार्यालये आहे. ऑगस्ट महिन्यात भिवंडीमधील कारखान्यात असताना कमलकांत यांच्या पोटात दुखू लागले. त्यांना अंधेरी येथील क्रिटिकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. आठ ते दहा दिवसांच्या उपचारानंतरही प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना बॉम्बे हॉस्पिटलला हलविण्यात आले.