मुंबई -मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने (एमएमआरडीए) ने मेट्रो 2 ब अर्थात डी.एन. नगर ते मंडाले मेट्रो मार्गातून दोन प्रस्तावित मेट्रो स्थानक वेगळले आहेत. यात कुर्ला मेट्रो स्थानकाचा समावेश आहे. यावरुन कुर्लावासी आणि लोकप्रतिनिधींनी एमएमआरडीएला धारेवर धरण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार आज (शनिवार) शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांनी एमएमआरडीए अधिकाऱ्यांची भेट घेत कुर्ला स्थानक का वगळले, असा सवाल केला आहे. तर डिटेल प्रोजेक्ट रिपोर्टमधील (डीपीआर) चुका सुधारण्यासाठी दोन स्थानके वगळली असतील तर सल्लागाराविरोधात दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी ही यावेळी करण्यात आली.
मेट्रो 2 ब डी.एन. नगर येथून सुरू होऊन मंडालेला येऊन संपणार आहे. तर या 23.5 किमीच्या मेट्रो मार्गाच्या मूळ आराखड्यात 22 मेट्रो स्थानकांचा समावेश होता. मात्र, आता यातील 2 स्थानके कमी करण्यात आल्याने या मार्गात 20 मेट्रो स्थानके असणार आहेत. एमएमआरडीएने काही दिवसांपूर्वी हे बदल केले आहेत. यासाठी नागरिकांच्या सूचना-हरकती ही घेण्यात आल्या नसल्याचीही धक्कादायक माहिती समोर आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी ही माहिती समोर आणली. यानंतर एमएमआरडीएच्या या मनमानी कारभारावर नाराजी व्यक्त होत आहे.
मेट्रो 2 ब मधून कुर्ला स्थानक का वगळले? स्थानिक लोकप्रतिनिधींचा एमएमआरडीएला सवाल - Shivsena mla mangesh kudalkar
मेट्रो 2 ब मधून कुर्ला स्थानकाला का वगळले? असा सवाल तेथील स्थानिक लोकप्रतिनिधींनी एमएमआरआरडीएला केला आहे.
याच पार्श्वभूमीवर आज (शनिवारी) आमदार कुडाळकर आणि गलगली यांनी एमएमआरडीएचे वरिष्ठ अधिकारी पीआरके मूर्ती यांची भेट घेतली. भेटीत कुर्ला मेट्रो स्थानक का वगळले? याचा खुलासा करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी मूर्ती यांनी आराखड्यात का बदल केला हे मांडले. मात्र, यावर समाधान न झाल्याने कुडाळकर यांनी सल्लागाराविरोधात दंडात्मक कारवाईची मागणी केली आहे.
जर सल्लागाराने डीपीआर चुकीचा केला आणि त्यामुळे अचानकपणे बदल करावे लागले असतील तर सल्लागाराकडून दंड वसुल करावा, अशी मागणी गलगली आणि कुडाळकर यांनी यावेळी केली. तसेच कुर्ला पूर्व येथील इमारत क्रमांक 81, 82 आणि 83 जी मेट्रो 2 ब मुळे प्रभावित होत आहेत. या इमारतींचा विकासक लवकरात लवकर करण्याची आग्रही मागणी केली. तर कुर्ला पूर्व येथील मेट्रो स्टेशन परिसर सुशोभित करत सर्व अडथळे दूर करण्याची मागणी केली.