मुंबई : दरवर्षी 1 मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. याशिवाय या दिवशी आंतरराष्ट्रीय कामगार दिन देखील साजरा केला जातो. हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड उत्साहात साजरा केला जातो. आजच्याच दिवशी 1960 मध्ये महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांची स्थापना झाली होती.
महाराष्ट्र दिनाचा इतिहास : भारताला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देशाची प्रादेशिक रचना खूप वेगळी होती. स्वातंत्र्यानंतर शेकडो छोटी-छोटी राज्ये एकत्र करत राज्य व्यवस्था स्थापन करण्यात आली. 1956 मध्ये राज्य पुनर्रचना कायद्याने भाषेच्या आधारे भारतातील राज्यांच्या सीमा निश्चित केल्या गेल्या. परंतु अनेक भाषा बोलणाऱ्या बॉम्बे राज्याच्या सीमा विसंगत होत्या. या राज्यात मराठी आणि गुजराती या दोन भाषा बोलणाऱ्या लोकांचा समावेश होता. या मतभेदांमुळे बॉम्बे राज्याचे दोन राज्यांमध्ये विभाजन करण्यासाठी चळवळ झाली. परिणामी मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्र आणि गुजराती भाषिकांसाठी गुजरात ही दोन राज्ये मुंबई पुनर्रचना कायदा 1960 अंतर्गत अस्तित्वात आली. हा कायदा 1 मे 1960 रोजी लागू झाला. तेव्हापासून हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो.
संयुक्त महाराष्ट्रासाठी 106 जणांचे बलिदान :संयुक्त महाराष्ट्रासाठी जवळपास 5 वर्षे विलक्षण लढा दिला गेला. या आंदोलनाचा प्रभाव सत्ताधारी पक्ष आणि राजकीय नेत्यांवर देखील पडला. या चळवळीत महिलांसह सर्वसामान्यांचा देखील मोठा सहभाग होता. ही चळवळ संयुक्त महाराष्ट्र समितीच्या नेतृत्वाखाली लढल्या गेली. यामध्ये कम्युनिस्ट पक्ष, प्रजा समाजवादी पक्ष, शेतकरी आणि कामगार पक्ष तसेच रिपब्लिकन पक्ष हे चार प्रमुख पक्ष होते. संयुक्त महाराष्ट्रासाठी त्यावेळी मोठे आक्रमक आंदोलन झाले. यावेळी सर्वत्र संचारबंदीचे आदेश होते. पुणे, नाशिक, कोल्हापूर, बेळगाव येथे पोलिसांच्या गोळीबारात सात जणांचा मृत्यू झाला होता. 16 ते 22 जानेवारी या कालावधीत 90 जणांचा मृत्यू झाला. अशाप्रकारे एकूण 106 जणांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान दिले. तसेच यावेळी सुमारे 10,000 सत्याग्रहींना देखील अटक करण्यात आली होती.
मुंबईसाठी दोन राज्यांमध्ये संघर्ष : महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यांमध्ये मुंबई (तत्कालीन बॉम्बे) शहरावरून मोठा वाद झाला होता. बॉम्बेला महाराष्ट्रात सामील करावे असे मराठी लोकांचे मत होते, कारण येथील बहुतेक लोक मराठी बोलत. 1956 मध्ये बॉम्बे या द्विभाषिक राज्यातून वेगळे मराठी भाषिक राज्य निर्माण करण्याची मागणी सुरु झाली. त्याच वर्षी गुजरात भाषिकांसाठीच्या वेगळ्या राज्यासाठी महागुजरात चळवळ सुरु झाली होती. त्यांनीही मुंबईला गुजरात मध्ये सामिल करण्याची मागणी केली. त्यासाठी प्रभावशाली आणि शक्तिशाली गुजराती उद्योगपतींनी मुंबईच्या मुख्यमंत्र्यांवर दबाव आणला. मोरारजी देसाई यांनी मुंबईचा एकतर गुजरातमध्ये समावेश करावा किंवा मुंबई केंद्रशासित प्रदेश बनवावे, अशी भूमिका घेतली.