मुंबई- देवाला रिटायर्ड करायची वेळ आली आहे, असा विचार डॉ. श्रीराम लागू यांनी त्यांच्या एका लेखातून मांडला होता. दैववादावर अवलंबून न राहता माणसाने कायम प्रयत्नवादावर अवलंबून रहायला हवं, असं त्यांचं मत होतं. मात्र, लोक देवावर अवलंबून राहून त्याच्या नादी लागून स्वतःच नुकसान करून घेतात, अशी भूमिका त्यांनी आपल्या या लेखातून मांडली होती.
हेही वाचा -'मराठी रंभूमीला सुवर्ण काळात आणणाऱ्या दिग्गजांपैकी डॉ. लागू हे एक'
पेशाने डॉक्टर असलेले श्रीराम लागू हे विचारांनी नास्तिक होते. दैववादावर त्यांचा अजिबात विश्वास नव्हता. देवाच्या नावाने केल्या जाणाऱ्या कर्मकांडाच्या ते ठाम विरोधात होते. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याचे ते खंदे पुरस्कर्ते होते. अनेकदा त्यांनी समाजातील चुकीच्या चालीरितिच्या विरोधात आपली भूमिका मांडली. आपल्या लेखातून त्यांनी देवाला आता रिटायर्ड करायची वेळ आली आहे, अशी भूमिका मांडल्यानंतर त्यावर त्यांना विरोधाचा सामनाही करावा लागला. मात्र, त्याने ते आपल्या मतापासून कधीही विचलित झाले नाहीत.