महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Rohit Pawar On Bhimashankar Jyotirlinga : भीमाशंकर ज्योतिर्लिंग प्रकरणावरून रोहित पवारांची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

भीमाशंकर ज्योतिर्लिंगाच्या मुद्द्यावर एकनाथ शिंदे आसामच्या मुख्यमंत्र्यांना जाब का विचारत नाहीत? असा सवाल आमदार रोहित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारला विचारला आहे.

Rohit Pawar On Bhimashankar Jyotirlinga
रोहित पवारांची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका

By

Published : Feb 15, 2023, 9:37 PM IST

रोहित पवारांची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका

मुंबई : आसाम सरकारने आसाममध्ये असलेल्या भीमाशंकर यांचे मंदिर हेच बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक मंदिर असल्याची जाहिरात केल्यानंतर राज्यात विरोधकांनी या मुद्द्यावर राज्य सरकारवर, मुख्यमंत्र्यांवर टीका करायला सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावर आसामच्या मुख्यमंत्र्यांना यावर सवाल का विचारत नाहीत असा मुद्दा विरोधकांकडून उपस्थित करण्यात येतो आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही याच मुद्द्यावरून यांच्यावर टीका केली आहे. आसाम राज्याकडून भीमाशंकर मंदिराबाबत करण्यात आलेला दावा म्हणजे खरेच आश्चर्य आहे. गुजरातमध्ये इलेक्शन आले तर फॅाक्सकॅान इतर प्रकल्प त्या राज्यात नेण्यात आले.

शिंदे सरकारने उत्तर द्यावे :कर्नाटक राज्यात निवडणुकांच्या पार्शभूमीवर प्रकल्प गेले. आता मध्यप्रदेशमध्ये निवडणुका आल्या आहेत. बिहार इलेक्शन वेळी अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांचा मुद्दा समोर आण्यात आला. आता आसामच्या मुख्यमंत्र्यांनी सहावे जोतीर्लिंग महाराष्ट्रात नसून आसमामध्ये आहे असे, सांगितले आहे. आम्ही त्याचा विरोध करतो. मात्र सत्तांतर होताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गोहाटीत होते. तेथील मुख्यमंत्री यांच्याशी संपर्क होता. मग त्यांनी आता याचे उत्तर दिले पाहिजे असा मुद्दा रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

मुख्यमंत्री गप्प का?आज रोहीत पवार यांनी विधान भवन येथे पत्रकारांशी संवाद साधताना हे वक्तव्य केले. भीमाशंकर मंदिर आता आसामचे आहे असे वक्तव्य येणे हे खूप चुकीचे आहे. आजवर कधी ही झाले नाही असे होत आहे. आसाममधले लोक सांगताहेत की भीमाशंकर त्यांचे आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर द्यावे. सत्ता स्थापन करण्याआधी ते गुआहाटीला गेले होते. तिथे सत्ता स्थापन करण्याआधी आसाम सरकारने बंडखोरांचे आदरतिथ्य केले होते. त्यामुळे मुख्यमंत्री गप्प आहेत का? मुख्यमंत्र्यांनी राजकारण केले. आता त्यांनी यावर खुलासा करावा असे रोहीत पवार म्हणाले.


एसटीच्या मुद्यावर राजकारण केले : दर महिन्याला एसटी कर्मचाऱ्यांचा पगार उशिरा होत आहे. एसटी महामंडळाला 360 कोटी रुपये देण्याचे ठरले असताना देखील राज्य सरकार गेल्या काही महिन्यापासून एसटी महामंडळाला पैसे देत नाही. या मुद्द्यावरून देखील रोहित पवार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. महाविकास आघाडी सरकार असताना एसटी कर्मचाऱ्यांना आम्ही विचारात घेतले. पैसे उपलब्ध करून दिले. अजित पवार यांनी महामंडळाला मदत केली. महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न होता की एसटी कर्मचाऱ्यांना अडचण येवू नये. भाजपच्या काही नेत्यांनी या कर्मचाऱ्यांच्या जीवावर राजकारण केले. आज ते लोक कुठेच दिसत नाही असा टोला रोहित पवार यांनी लगावला. तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या पुन्हा एकदा होणाऱ्या अर्थसंकल्प अधिवेशनात मांडून राज्य सरकारला एसटी कर्मचाऱ्यांना मदत करण्यासाठी भाग पाडू असा इशाराही रोहित पवार यांनी यावेळी दिला.


फडणीसांचे राजकीय हेतूतून वक्तव्य :अजित पवार यांच्यासोबत पहाटेचा शपथविधी शरद पवार यांच्यासोबत चर्चा केल्यानंतरच केला होता असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले होते. मात्र, देवेंद्र फडणवीस यांचे हे वक्तव्य राजकीय हेतूने पुरस्कृत असल्याची टीका आमदार रोहित पवार यांनी केली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीआधी त्यांनीच अशाप्रकारेच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत कधीही युती करणार नाही असे वक्तव्य केले होते. होत असलेल्या निवडणुकीत सहानुभूती मिळवण्यासाठी असे वक्तव्य केली जात असल्याचेही रोहित पवार यावेळी म्हणाले.


जयंत पाटील यांची कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी :उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाढदिवस आहे. मात्र या निमित्ताने मुंबईतील काही भागात जयंत पाटील हे भावी मुख्यमंत्री असल्याचे पोस्टर झळकले आहेत. यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असताना यावर रोहित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. राजकीय नेत्यांच्या समर्थकांकडून अशा प्रकारची अनेक वेळा बॅनरबाजी करण्यात येते. यामध्ये नेत्यांचा काहीही सहभाग नसतो असे स्पष्टीकरण रोहित पवार यांनी दिले आहे.

हेही वाचा - Jitendra Awhad : मोठी बातमी! जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना मारण्याचा कट; क्लिप वायरल

ABOUT THE AUTHOR

...view details