मुंबई -वरिष्ठ वकील नितीन सातपुते यांनी मुंबई उच्च न्यायालयात ईडी अधिकाऱ्यांविरोधात फौजदारी कलमानुसार कारवाई करण्यात यावी अशी मागणी जनहित याचिकेतून करण्यात आली आहे. मुख्य न्यायमूर्ती यांच्या नियुक्तीनंतर खंडपीठाची स्थापना झाल्यानंतरच या याचिकावर सुनावणी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्याच्या राजकारणातील आताची एक महत्त्वाची बातमी. शिंदे गटात गेल्यानंतर आरोप असलेल्या आमदार आणि खासदारांवर ईडीने काय कारवाई केली असा सवाल उपस्थित करत ईडीविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात वरिष्ठ वकील नितीन सातपुते यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. ईडीच्या रडारवर असलेल्या शिंदे गटात गेलेल्या खासदार आमदारांवर काय कारवाई केली यासंदर्भातील माहिती देण्यात यावी असं या याचिकेत सांगण्यात आलेलं आहे.
सुनावणी 15 डिसेंबर रोजी होणार - शिंदे गटात गेलेले आनंदराव अडसूळ, अर्जुन खोतकर, यशवंत जाधव आणि त्यांची पत्नी आमदार यामिनी जाधव, भावना गवळी, प्रताप सरनाईक यांना समन्स देण्यात आले होते. शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी भाजपशी हातमिळवणी केल्यानंतर ईडीने समन्स जारी करण्याची कोणतीही कारवाई केलेली नाही, असा याचिकेत दावा करण्यात आला आहे. ईडीकडून कारवाईचा अहवाल घ्या आणि तो 7 दिवसांत सादर करा अशी मागणी याचिकेतून न्यायालयाकडे करण्यात आली आहे. या याचिकेवर पुढील सुनावणी 15 डिसेंबर रोजी होणार आहे.
हे नेते होते ईडीच्या रडारवर -शिवसेनेतून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे यांच्यासह चाळीस आमदारांनी शिंदे गट स्थापन केला. त्यानंतर भाजपशी हातमिळवणी करुन राज्यात सत्तांतर घडवले. ईडीच्या रडारवर असलेल्या नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटाचा आश्रय घेतला आणि कारवाई लांबवली. यापैकी प्रताप सरनाईक एकनाथ शिंदे यांचे कट्टर विरोधक मानले जायचे, एनएससीएल घोटाळ्याप्रकरणी प्रताप सरनाईक ईडीच्या रडारवर होते. प्रताप सरनाईक यांची मालमत्ताही जप्त करण्यात आली होती. पण आता शिंदे गटात सामिल झाल्यानंतर प्रताप सरनाईक यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. तसेच, त्यांच्याबाबत आता किरीट सोमय्याही काहीही बोलत नाहीत.