मुंबई:महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRCL) संचालक मेट्रो लाईन तीनच्या प्रशासकीय सर्वेसर्वा वरिष्ठ सनदी अधिकारी अश्विनी भिडे (Senior Officer Ashwini Bhide) या नुकत्याच पत्रकारांवर चिडताना पाहायला मिळाल्या होत्या. असं काय घडलं होतं की त्या पत्रकारांवर चिडल्या, भडकल्या आणि मधेच निघुनही गेल्या. भिडे यांच्याकडे मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदाचा कार्यभार आहे या नात्याने शिक्षण विभागाची पत्रकार परिषद सुरू असताना पत्रकारांनी त्यांना मेट्रो लाईन तीन चार कामाबाबत रहिवाशांमध्ये असलेली नाराजी आणि आंदोलनाबाबत प्रश्न विचारले असता त्या संतापल्या.
पत्रकार परिषदेतून निघून गेल्य: पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर न देताच त्या पत्रकार परिषदेतून निघून गेल्या. मेट्रो लाईन तीनच्या अनेक प्रवाशांच्या रहिवाशांच्या घरांबाबत तसेच त्यांच्या कागदपत्रांबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत या संदर्भात समाधानकारक उत्तरे त्यांना हवी आहेत मात्र प्रशासन म्हणून आपण भूमिका बजावत असताना मेट्रोच्या कार्यालयात मेट्रोबाबत उत्तरे देऊ महापालिकेच्या पत्रकार परिषदेत मेट्रोच्या प्रश्नांना स्थान नाही असे सांगत त्या निघून गेल्या. वास्तविक दोन्ही पदांचा कार्यभार त्यांच्याकडे असल्याने त्यांना दोन्ही खात्यांचा कारभार वेगवेगळ्या ठेवण्याची इच्छा आहे. त्यानुसार त्या वागत असतात.
काय आहे रहिवाशांची मागणी :मेट्रो लाईन तीनच्या कामा संदर्भात गिरगाव येथील अनेक रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आधी पुनर्वसन नंतर प्रकल्प या मागणीवर ठाम असलेल्या आणि या भूमिकेशी प्रशासन आणि अश्विनी भिडे सुद्धा सहमत आहेत. मात्र अनेक रहिवाशांकडे 1995 पूर्वीचे पुरावे उपलब्ध नसल्याने त्यांच्या प्रमाणीकरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे यासंदर्भात अश्विनी भिडे यांनी काय तोडगा काढला याबाबत पत्रकारांना माहिती विचारली होती. नागरिकांना त्यांच्या हक्काची घरे आणि पुनर्वसन मिळावे यासाठी आता स्थानिक पातळीवर आंदोलनही सुरू करण्यात आल्याने या भागातून मेट्रो लाईन तीन व चारच्या कामांमध्ये अडथळा निर्माण झाला आहे त्यामुळे भिडे अधिक संतापल्या होत्या.
कोण आहेत अश्विनी भिडे:शिंदे- फडणवीस सरकार कार्यरत झाल्यानंतर प्रशासकीय अधिकारी अश्विनी भिडे यांना परत एकदा मेट्रो प्रकल्पाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नेमण्याचा निर्णय तातडीने घेण्यात आला आणि यानिमित्ताने त्या पुन्हा एकदा नव्याने चर्चेत आल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या त्या मर्जीतल्या अधिकारी आहेत अशी चर्चा आहे. तासगाव- कराडच्या शाळेत शिक्षण, गुणवत्ता यादीत येऊनही सायन्स- कॉमर्सऐवजी आर्ट्स शाखेची त्यांनी निवड केली. आजूबाजूला कोणालाच प्रशासकीय सेवेची फारशी माहिती नसतानाही त्यांनी या क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला आणि मग, मिळालेल्या प्रत्येक पदावर त्यांनी आपल्या कामाची छाप पाडली. सध्या त्यांची ‘मेट्रो वुमन’ ही ओळख जास्त चर्चेत आहे.
कशी मिळाली मेट्रो वुमनची ओळख :२०१५ मध्ये भाजप- सेनेची युती सत्तेत असताना देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाकांक्षी ‘मुंबई मेट्रो’ प्रकल्पाची घोषणा करत भिडे यांना त्या प्रकल्पाच्या संचालकपदी नेमले. कुलाबा- वांद्रे-सिप्झ असा मेट्रो-३ चा ३३ किलोमीटरचा प्रवास असून त्यात २६ स्टेशन्स अंडरग्राउंड बांधली जाणार आहेत. मुंबईच्या पायाभूत सुविधांची सखोल माहिती असलेल्या अश्विनी भिडे यांनी या प्रकल्पाची धुरा हाती घेतल्यापासूनच वेगाने कामे सुरू केली. प्रकल्पाची व्याप्ती लक्षात घेता त्यापुढची आव्हानेही मोठी आणि तीव्र होती. जमीन संपादन, पर्यावरण विभागाच्या परवानग्या, प्रदुषणाचे नियम सांभाळून काम, नाराज रहिवाशांची समजूत घालून त्यांच्या स्थलांतरापर्यंत विविध गोष्टी त्यांनी शिताफीने पार पाडल्या. त्यांची काम करण्याची आणि इतरांकडून काम करवून घेण्याची पद्धत, त्यांचे ज्ञान व धडाडी आणि मुख्य म्हणजे, मेट्रोच्या कामाचा वेग पाहून त्यांना आपसूक ‘मेट्रो वुमन’ असे नाव मिळाले.
अश्विनी भिडे यांची बदली : अश्विनी भिडे आणि आदित्य ठाकरे यांच्यात कारशेडवरून वाद झाला. पर्यावरणवाद्यांनीही वृक्षतोडीला कडाडून विरोध केला, मात्र आरेची जागा तांत्रिकदृष्ट्या कारशेडसाठी योग्य असल्याच्या मुद्द्यावर त्या ठाम राहिल्या. मात्र, कोर्टाचा आदेश आल्यानंतर रात्री काळोखातच आरेमधली २००० झाडे कापण्यात आली आणि त्यावरून अश्विनी भिडे यांच्यावर प्रचंड टीका झाली. पुढे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर साहजिकच त्यांना तातडीने मेट्रोच्या कामातून बाजूला करण्यात आले. मात्र शिंदे फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांची पुन्हा एकदा एमएमआरसीएल च्या संचालक पदी नियुक्ती झाली.