मुंबई:विधानपरिषदेमध्ये राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेमध्ये आमदार सत्यजीत तांबे यांनीही सहभाग घेतला. दरम्यान, देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये 75 हजार पदांसाठीच्या नोकरभरतीचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. मात्र ती कधी होणार, कशी होणार, किती वेळात होणार याबद्दल अभिभाषणात कुठेही उल्लेख नाही. 'शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती होताना दिसत नाही. 2 लाखांपेक्षा जास्त रिक्त आहे. मात्र 75 हजार जागांच्या भरतीने किती युवकांना न्याय मिळणार आहे? सरकारला विनंती आहे की कोविड काळात विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाही. यामुळे म.प्र सरकारने वयाची अट 3 वर्ष शिथील केली. राजस्थानने वयाची अट 4 वर्ष शिथील केली. आंध्र प्रदेशने वयाची अट 2 वर्ष शिथील केली. महाराष्ट्राने मात्र याबाबत कोणताही निर्णय घेतला नसल्याची बाब सत्यजीत यांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिली.
किती रोजगार निर्मिती झाली?विकासाचा समतोल साधण्यासाठी दावोसमध्ये 1 लाख 37 हजार कोटींच्या एमओयूंचा उल्लेख राज्यपालांच्या भाषणात आहे. एमओयू होत असताना आम्ही गेली अनेक वर्ष पाहतोय की कंपन्या येतात, फोटोसेशन होतात, एमओयू होतात, सरकार कोणाचेही असो प्रत्यक्षात किती उद्योग येतात हा मोठा संशोधनाचा विषय आहे. या उद्योगातून किती रोजगार निर्मिती झाली हे आपण कळू शकले नाही. हे उद्योग येत असताना ठराविक एमआयडीसीमध्येच येतात, ते सगळ्या जिल्ह्यांमध्ये यावेत यासाठी आपण का प्रयत्न करत नाही ? असा सवाल सत्यजीत यांनी विचारला.
उद्योग गुजरातला:देशाच्या एकूण जीडीपीच्या 14.2 टक्के जीडीपीचा वाटा हा महाराष्ट्राचा आहे. महाराष्ट्राच्या जीडीपीतील 40 टक्के वाटा हा कोकणाचा म्हणजेच मुंबईचा आहे. त्याखालोखाल पुणे विभागाचा 22 , नाशिकचा 12 टक्के, औरंगाबादचा 10, नागपूरचा 9 टक्के वाटा असून सगळ्यात कमी वाटा अमरावतीचा 5.7 इतका आहे. ही आकडेवारी सादर करताना सत्यजीत यांनी म्हटले की, विकासाचा समतोल साधण्यासाठी सरकारने पावले उचलली पाहिजे. फॉक्सकॉनसारखी कंपनी गुजरातला गेली. त्याचवेळी पंतप्रधानांनी सांगितले की तितकाच मोठा प्रकल्प महाराष्ट्राला देऊ. मात्र 6 महिने होऊन गेले तरी त्याबद्दल काहीही हालचाल झालेली दिसत नसल्याचे तांबे म्हणाले.