मुंबई -शरद पवार यांच्या निवृत्तीनंतर त्यांचा खरा वारसदार कोण अशी चर्चा सुरू होणे क्रमप्राप्त आहे. पवार यांनी राजीनाम्याची घोषणा करताच आधी दबक्या आवाजात सुरू असलेली या गोष्टीची चर्चा थेटपणे सुरू झाली आहे. शरद पवार यांचा थेट राजकीय वारसा त्यांच्या कन्या सुप्रिया पवार यांच्याकडे आहे. त्याचवेळी पुतणे अजित पवार यांनाही शरद पवार यांचे खरे वारसदार मानण्यात येते. त्याचबरोबर पक्षातील इतर प्रमुख नेत्यांमध्ये विद्यमान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील तसेच पवारांच्या पिढीतील श्रीनिवास पाटील यांची शरद पवारांशी खास जवळीक राहिली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढील अध्यक्ष कोण हे ठरतानाच शरद पवार यांचा वारसदारही एका अर्थाने ठरणार आहे.
सुप्रिया सुळे यांचा पहिला ह्क्क ? - शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे या केंद्रिय राजकारणात रमलेल्या एक धुरंधर राजकारणी आहेत. राज्याच्या राजकारणात त्यांनी थेटपणे फार काही खास लक्ष घातलेले दिसत नाही. मात्र खासदार म्हणून सुप्रिया सुळे यांची कारकीर्द राष्ट्रवादी काँग्रेसच्या अभ्यासू आणि बाणेदार नेत्या म्हणून नेहमीच गाजत आलेली आहे. सुप्रिया सुळे यांनी २००६ साली राज्यसभेच्या खासदार म्हणून आपल्या संसदिय राजकीय प्रवासाला सुरुवात केली. संसदेमध्ये अत्यंत अभ्यसू खासदार म्हणून थोड्याच काळात त्यांनी नावलौकिक मिळवला.
महाराष्ट्रातील प्रश्नाांच्यावर पकड असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राज्याचे प्रश्न हिरीरीने संसदेत मांडले. त्यानंतर २००९ मध्ये सुप्रिया सुळे शरद पवार यांचा मतदारसंघ असलेल्या बारामती मतदार संघातून लोकसभेच्या खासदार झाल्या. प्रचंड मताधिक्याने सुप्रिया यांचा विजय या ठिकाणी झाला. त्यामुळे शरद पवार यांच्या वारसदार म्हणून बारामतीच्या लोकांनी त्यांचा स्वीकार केल्याचे या निकालावरुन स्पष्ट झाले. त्यानंतरही सुप्रिया सुळे यांनी या विजयाची परंपरा कायम राखली आहे. सध्या सुप्रिया सुळे या बारामतीच्या खासदार म्हणून लोकसभेत कार्यरत आहेत. प्रश्न मांडण्याची त्यांची सचोटी आणि एखाद्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी त्या करत असलेल्या पाठपुराव्यासाठी प्रसिद्ध आहेत. सुप्रिया सुळे यांना संसदरत्न पुरस्काराने अनेकदा सन्मानित करण्यात आले आहे.
राज्याच्या निवडणुकीच्या राजकारणात सुप्रिया सुळे यांचा थेट कधी संबंध आला नसला तरी शरद पवार, अजित पवार आणि इतर नेत्यांच्याबरोबर सुप्रिया सुळे यांनीही राज्यातील प्रचाराच्या अनेक सभा गाजवल्या आहेत. राज्यातील निवडणुकीमध्ये तिकीट वाटपाच्या समित्यांवरही सुप्रिया सुळे यांनी काम केले आहे. त्यामुळे जरी राज्यातील राजकारणात सुप्रिया सुळे थेटपणे आमदार म्हणून कार्यरत नसल्या तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खंद्या नेत्या म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. तसेच शरद पवार यांच्या थेट राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
अजित पवार खंदे दावेदार- राजकारणात आल्यापासून शरद पवार यांच्याबरोबर सावलीसारखे राहिले, ते अजित पवार. महाराष्ट्रात काका-पुतण्यांचे राजकारण विचारात घेतल्यास बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे तसेच शरद पवार आणि अजित पवार यांच्या प्रतिमा समोर येतात. आताच्या घडीला सु्प्रिया सुळे यांच्याबरोबरच शरद पवार यांचे खंदे समर्थक म्हणून अजित पवार यांचेच नाव त्यांचे खरे वारसदार म्हणून पुढे येते. राज्याच्या राजकारणावर पकड असलेले नेते म्हणून अजित पवार यांची प्रतिमा आहे. पक्ष, राजकारण त्याचबरोबर प्रशासनावरही वचक असलेला नेता म्हणून अजित पवार यांच्याकडे पाहिले जाते. स्पष्टवक्ते किंवा फटकळ नेते अशी बिरुदावलीही अजित पवार यांना लावण्यात येते. राज्यामध्ये राजकारणात येण्याआधी अजित पवार यांनी केंद्रातही रष्ट्रवादी काँग्रेसचे नेते म्हणून मुशाफिरी केली आहे. अजित पवार १९९१ साली पहिल्यांदा बारामतीमधून लोकसभेवर निवडून गेले. मात्र अजित पवार दिल्लीत काही रमले नाहीत. ते सहा महिन्यात राजीनामा देऊन महाराष्ट्रात परतले.
राज्याच्या राजकारणात मात्र अजित पवार यांची चढती कमान राहिली आहे. शरद पवार यांचे वारसदार म्हणूनच त्यांच्याकडे पाहिले जाऊ लागले. अजित पवार १९९५ पासून राज्यात आमदार, मंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधीपक्षनेते म्हणून आजपर्यंत कार्यरत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर त्यांची पकड किती मजबूत आहे ते यावरुन कळते की सध्या प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत. मात्र विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेतेपदाची जबाबदारी अजित पवार यांच्याकडे आहे. राज्यातील पक्षाचे निर्णय शरद पवार यांच्याबरोबरीने अजित पवार घेत असल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शरद पवार यांचा राजकीय वरसदार म्हणून अजित पवार यांची दावेदारी जोरदार आहे.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील - राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील हे विद्यमान परिस्थितीत पक्षाची धुरा वाहण्यास अत्यंत योग्य नेतृत्व असल्याचे मानले जाते. शरद पवार यांच्यासारखाच शांत संयमी स्वभाव यासाठी जयंत पाटील प्रसिद्ध आहेत. लोकसंग्रहाचे बाळकडू त्यांना त्यांच्या वडिलांच्याकडून मिळाले. वडील राजाराम बापू पाटील हे काँग्रेसचे नेते होते. जयंत पाटील यांचे शिक्षण अमेरिकेत झाले असले तरी ते महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चांगलेच मुरलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद ते शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी असल्याने त्यांच्याकडे आले आहे. शरद पवार यांचा वारसा ते चांगल्या पद्धतीने चालवून पक्षीय राजकारणात ते नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेसला ऊर्जितावस्था प्राप्त करुन देतील अशी त्यांची राजकीय कारकीर्द राहिली आहे. सर्वाधिक वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर केलेले अर्थमंत्री म्हणून जयंत पाटील यांची ख्याती आहे. पक्षामध्ये अजित पवार यांच्याप्रमाणेच जयंत पाटील यांनाही मानणाने अनेक नेते आहेत. शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केल्यावर जयंत पाटील यांना भावना अनावर झाल्या होत्या. ते बोलायला उभे राहिले मात्र काही काळ ते बोलूच शकले नाहीत. शेवटी जयंत पाटील बसूनच बोलले. त्यांची शरद पवार यांच्याशी किती भावनिक एकरुपता आहे, ते यावरुन दिसून आले आहे. त्यामुळे जयंत पाटील यांनाच शरद पवार यांचे खरे वारसदार मानण्यात येते.
असंख्य विश्वासू नेत्यापैकी कुणाचा नंबर - शरद पवार यांच्या पक्षाचा म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा नुकताच गेलेला आहे. त्यामुळे त्यांचा पक्ष हा आता प्रादेशिक पक्ष म्हणूनच राहिला आहे. तरीही राष्ट्रीय राजकारणात शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू म्हणून प्रफुल्ल पटेल यांचे नाव घेतले जाते. त्याचबरोबर दिलीप वळसे पाटील आणि इतर अशी असंख्य नावे आहेत. एवढेच नाही तर पुढील पिढीतील नेतृत्व असलेले रोहित पवार यांच्यावरही शरद पवारांनी लोकलेखा समितीच्या अध्यक्ष पदाची धुरा सोपवण्याची शिफारस करुन मोठा विश्वास दाखवला. त्यामुळे यापैकी एखादा नेता शरद पवार यांचा वारसदार म्हणून नजिकच्या काळात पुढे आल्यास काही आश्चर्य वाटायला नको.
हेही वाचा - Sharad Pawar Political Decisions : पक्षाविरोधातच केले होते बंड; शरद पवारांचे 'हे' महत्वपूर्ण राजकीय निर्णय